लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर मंगळवारी डेक्कन क्वीन व पंजाब मेल एक्स्प्रेसचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यंदाही कोरोनामुळे डेक्कन क्वीन रद्द होती. मात्र, प्रथेप्रमाणे रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने मोठ्या उत्साहात केक कापून दोन्ही गाड्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
पुणे- मुंबई दरम्यान दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असणाऱ्या डेक्कन क्वीनला मंगळवारी ९१ वर्षे पूर्ण झाली. तर पंजाब मेल एक्स्प्रेसला ११० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त मंगळवारी पुणे स्थानकावरील फलाट १ वर एक छोटेखानी कार्यक्रम पार पडला.
१ जून १९३० रोजी दख्खनची राणी म्हणजेच डेक्कन क्वीन एक्स्प्रेस सुरू झाली. या एक्स्प्रेसने ९२ व्या वर्षात पदार्पण केले. मागील ६७ वर्षांपासून स्थानकात दर वर्षी डेक्कन क्वीनचा थाटात वाढदिवस साजरा करण्यात येतो. दर वर्षी डेक्कन क्वीनला फुगे आणि फुलांच्या माळांनी सजवून, रेल्वे प्रवासी ग्रुप केक कापून मोठ्या थाटात वाढदिवस साजरा करते. मात्र कोरोनामुळे सलग दोन वर्षे वाढदिवशी डेक्कन क्वीनचा रेक मुंबई यार्डातच उभा आहे. त्यामुळे मागील वर्षी प्रमाणेच यंदा देखील संघाच्या वतीने स्थानकाच्या प्लॅटफॉर्म १ वर केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्षा हर्षा शहा, पुणे स्टेशनचे संचालक सुरेशचंद्र जैन, स्थानक व्यवस्थापक अजय सिन्हा, सुनील ढोबळे, मुख्य वाणिज्य निरीक्षक एम. मुरली यांच्या सह रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते.