तळेगाव ढमढेरे : येथे डीजेवर गाणी लावून वाढदिवस साजरा केला जात असताना शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकून डीजे जप्त करत डीजेचालक व मालकासह वाढदिवस असणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत. निखिल गोरक्ष गायकवाड व आकाश संजय गायकवाड, प्रदीप ज्ञानोबा पानसरे असे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
तळेगाव ढमढेरे येथे एका युवकाचा वाढदिवस असून त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी डीजेवर मोठ्याने गाणी लावून वाढदिवस साजरा केला जात असल्याची माहिती काही नागरिकांनी पुणे ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यांनतर पोलीस नियंत्रण कक्षाकडून शिक्रापूर पोलिसांना मिळाली असता शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक ब्रम्हानंद पोवार, पोलीस शिपाई राजेंद्र घनवट हे तळेगाव ढमढेरे येथे गेले. त्यांना येथील शिक्षक भवनच्या पाठीमागे एक डीजे सुरू असून मोठमोठ्याने गाणी लावून बेकायदेशीरपणे वाढदिवस साजरा केला जात असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी एमएच १२ एफडी ०९२८ हे डीजे वाहन ताब्यात घेत पोलीस स्टेशन येथे आणून जप्त केला,याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई राजेंद्र किसन घनवट यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी वाढदिवस असणारे युवक प्रदीप ज्ञानोबा पानसरे (रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरूर जि. पुणे), डीजेमालक निखिल गोरक्ष गायकवाड (रा. कळमकर वस्ती शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) व डीजेचालक आकाश संजय गायकवाड (रा. धानोरे, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आजिनाथ शिंदे हे करत आहे.
शिक्रापूर पोलिसांनी कारवाई करून जप्त केलेले डीजे वाहन.