Baramati: राष्ट्रवादीच्या माहेरघरी यंदा ‘साहेबां’चा वाढदिवस दुर्लक्षित; बदलत्या राजकारणाचे संकेत?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 01:24 PM2023-12-14T13:24:09+5:302023-12-14T13:24:57+5:30
प्रत्येक वेळी ‘साहेबां’ना भरभरून शुभेच्छा देणारे बारामतीकर यंदा व्यक्तच झाले नाहीत...
बारामती : देशाच्या राजकारणात नेहमीच वेगळ महत्त्व असणा रे,कायम राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आणि बारामतीचे अनाेखे नाते आहे. मात्र, राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या फुटीनंतर बारामतीकर आणि ‘साहेबां’चे नाते पुसट होत असल्याची भीती व्यक्त होत आहे. नुकत्याच १२ डिसेंबर रोजी पार पडलेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हे चित्र अधोरेखित झाले आहे.
प्रत्येक वेळी ‘साहेबां’ना भरभरून शुभेच्छा देणारे बारामतीकर यंदा व्यक्तच झाले नाहीत. बारामतीकर कृतघ्न झाले आहेत का, असाही प्रश्न या वाढदिवसाच्या निमित्ताने पुढे आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवशी पूर्ण शहर शुभेच्छांचे बॅनरने भरून गेले होते. तेच चित्र ‘साहेबां’च्या वाढदिवशी नेमके उलटे होते. यंदा ‘साहेबां’ना शुभेच्छा देणारे बॅनर शहरात लागलेच नाहीत.
बारामतीच्या बदलत्या राजकारणाचे हे संकेत मानले जात आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या फुटीनंतर बारामतीचे राजकारण पूर्णपणे बदलले आहे. एकीकडे अजित पवार गट प्रबळ होत आहे. तुलनेने मात्र शरद पवार गटाला राष्ट्रवादीच्या माहेरघरी अडचणीची स्थिती निर्माण होताना दिसत आहे. पक्षाच्या अंतर्गत घडामोडीनंतर शरद पवार यांच्या गटाला पदाधिकारी निवडीला साडेतीन महिन्यांचा कालावधी लागला. यावरूनच ‘साहेबां’च्या गटाला बारामतीत मोठा संघर्ष करावा लागण्याची चिन्हे आहेत. आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत दोन्ही गटांचे वाद विकोपाला जाण्याचे संकेत आहेत.
‘पवारसाहेबां’चे मूळ गाव वेगळे असले, तरी त्यांची कर्मभूमी बारामतीच आहे. याच बारामतीने ‘साहेबां’ना बारामतीपासून दिल्लीच्या राजकारणापर्यंत उच्च शिखरावर नेले. ‘साहेबां’नीही बारामतीवर नेहमीच भरभरून प्रेम केले. बारामतीच्या कृषी, सहकार, शिक्षण आदी क्षेत्रांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घेतलेली भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरली. मात्र, आता याच ‘साहेबां’चा बारामतीकरांना विसर पडला आहे का, अशी शंका निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बारामतीचा कायापालट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे बारामतीकर कोणाच्या पाठीशी राहणार, पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. २०२४ हे निवडणुकीचे वर्ष आहे. याच काळात बारामतीकर यावर शिक्कामोर्तब करतील. दरम्यान, बारामतीत महाविकास आघाडीच्या वतीने मात्र पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस केक कापून उत्साहात वाढदिवस साजरा केला.