पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 62 वाढदिवस आज साजरा होत आहे. अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री असल्याने पुणेकरांमध्ये आज उत्साहाचे वातावरण आहे. त्यातून, विविध विधायक उपक्रमांनी अजित पवार यांचा वाढदिवस साजरा होत आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनीही वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी आणि जाहिराती न करण्याचे सूचवले होते. त्यातून, पुण्यातील काही कार्यकर्त्यांनी १ रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोल देऊन वाढदिवसाचं आकर्षण वाढवलं आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील धानोरी येथे राष्ट्रवादी कार्यकर्ते व स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून केवळ 1 रुपयात एक लिटर पेट्रोल देण्यात येत आहे. त्यामुळे, येथील ठिकाणावर वाहनांच्या रांगा लागल्या असून अनेकांनी गर्दी केली आहे. हा उपक्रम जाणता राजा प्रतिष्ठान आणि शशिंकात टिंगरे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला. देशात पेट्रोलच्या दराने केव्हाच शंभरी गाठली आहे. त्यातच, मुंबई, पुण्यासह राज्यातील बहुतांश शहरात पेट्रोलचा (Petrol) प्रतिलीटर दर 107 रुपयांच्यापुढे गेला आहे. त्यामुळेच, 1 रुपयातं पेट्रोल घेण्यासाठी येथे दुचाकीच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं.
एकप्रकारे इंधनदरवाढीचा निषेधच
देशातील पेट्रोल दरवाढीवरुन केंद्र सरकारला लक्ष्य केलं जात आहे. याबाबत, अजित पवार यांनीही सातत्याने केंद्रावर टीका केली आहे. तर, काँग्रेससह राष्ट्रवादीनेही महागाई विरोधात आंदोलन करत इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला आहे. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज 1 रुपये दराने एक लिटर पेट्रोल देऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी एकप्रकारे केंद्र सरकारचा निषेधचं नोंदवला आहे.