Pune Porsche Car Accident: पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या कार अपघातामुळे राज्यासह देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. विशाल अग्रवाल यांच्या मुलाने भरधाव वेगाने आलिशान पोर्शे कार चालवत दुचाकीला धडक दिल्याने दोघांना विनाकारण जीव गमवावा लागलाय. या प्रकरणात अनेक धक्कादायक प्रकाराने उघडकीस येऊ लागली आहेत. पोलिसांनी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालसहित कुटुंबाची कुंडली बाहेर काढली आहे. या प्रकरणात रक्ताच्या नमुने बदलल्याप्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. त्यामुळे आता तपासाला चांगलाच वेग आला आहे. ससूनच्या या फेरफार प्रकरणाचीन चौकशीं करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
मंगळवारी (दि. २८) सकाळीच चाैकशी समिती पुण्यात धडकली. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने या समितीची चांगलीच बडदास्त ठेवली. त्यांना खुश ठेवण्यासाठी प्रसिद्ध हाॅटेलमधून बिर्याणी मागवण्यात आली हाेती, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. समितीचे सदस्य बिर्याणीवर ताव मारत होते, त्याचवेळी चौकशीसाठी उपस्थित असलेले कर्मचारी, परिचारिका, वैद्यकीय अधिकारी यांना ससून प्रशासनाने राेखून धरले हाेते. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने खास बिर्याणीचा बेत ठेवला हाेता. प्रसिद्ध हॉटेलमधून महागडी बिर्याणी मागविण्यात आली हाेती. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्या दालनातच चाैकशी समितीने ताव मारला.
अपघाताच्या प्रकरणात भयानक बाबी समोर येत असताना एकीकडे चक्क बिर्याणी पार्टी केली जात आहे. या बिर्याणी पार्टीनंतर ससून प्रशासन गंभीर नसल्याचे दिसू लागले आहे. ललित पाटील, उंदीर चावा प्रकरणात ससूनचे धिंडोळे निघाले असूनही प्रशासनाला अजूनही जाग येत नाहीये. चौकशी समितीला महागडी बिर्याणी मागवून स्वतःच्या दालनातच ताव मारायला देणे. याबाबत विनायक काळेंना सरकारने सवाल करावेत अशी चर्चा सुरु आहे.