पुणे : सराईत गुन्हेगाराला ससून रुग्णालयात उपचारासाठी आल्यानंतर तेथे साथीदारांना बोलावून सुपारी घेऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा खून घडवून आणण्याची घटना घडली असतानाही त्यातून पोलीस प्रशासन आणि ससून प्रशासन यांनी कोणताही धडा घेतला नसल्याचे समोर आले आहे. ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या एका सराईत गुन्हेगाराची व्हीआयपीसारखी बडदास्त ठेवली जात आहे. या कारागृहातील कैद्याला एकाचवेळी अनेक नातेवाईक तासन तास भेटायला येत असून त्याला सर्रास मोबाईलवर बोलायला दिले जात आहे. त्याच्या जोडीला खायला पराठा, चिकन मसाला आणि बिर्याणीही खिलवली जात आहे. विशेष म्हणजे हा कैदी जेव्हापासून दाखल झाला आहे, तेव्हापासून सुरक्षा रक्षक वॉर्डात फिरकताना दिसत नाही.
ससून रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातील गोरगरिबांसाठी संजीवनी आहे. त्यामुळे लांबून लांबून येथे उपचारासाठी गरीब जनता येत असते. वॉर्डात शांतता व स्वच्छता रहावी, यासाठी प्रशासनाने काही नियम केले आहेत. त्यामुळे रुग्णांबरोबर एकाचवेळी एकाच व्यक्तीला थांबण्याची सवलत आहे. पण, काही जणांबाबत हा अपवाद केला जात असल्याचे गेले काही दिवस दिसून येत आहे.
येरवडा कारागृहातून एक कैदी जेलच्या पोशाखात १६ मे रोजी ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १२ मध्ये दाखल झाला. त्यांच्याबरोबर बंदोबस्तावर पोलीस होते. तसेच रुग्णालय कर्मचारी आले होते. बेडवर येताच तेथील कर्मचाऱ्याने आपल्या मोबाईलवरून त्याला फोन लावून दिला. तो चक्क अर्धा तासाहून अधिक काळ मोबाईलवर बोलत होता. कैदी पळून जाऊ नये, म्हणून त्याच्या हातात बेडी घालून त्याची दुसरी बाजू बेडला लावली जाते. मात्र, हा कैदी व्हीआयपी असल्याने बेडी तशीच बेडला लोंबकळत पडली. हा मोबाईलवर बोलत वॉर्डात फिरत होता. त्याच्या बंदोबस्तासाठी आलेले पोलीस एका बाजूला बसले होते. दुसऱ्या दिवशी या कैद्याचे नातेवाईक, मित्र मंडळी असे जवळपास १० जण आले होते. ते जवळपास ५ तास त्याच्याबरोबर होते. या काळात ससून रुग्णालयातील एक कर्मचारी गळ्यात आयकार्ड घालून रुग्णालयाच्या गेटपासून नातेवाईकांना वॉर्डात घेऊन येत होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या या कैद्याला भेटायला येणारे नातेवाईक त्याच्यासोबत फोटो काढून घेत होते. आपल्या घरी व्हिडिओ कॉल करून त्या कैद्यांची बोलणी करून देत होते.
सुरक्षारक्षक गायब
एका रुग्णाजवळ एकाच नातेवाइकांना थांबता येते. यासाठी रुग्णालयातील सुरक्षारक्षक दर तासाला फेरी मारून आयकार्ड नसलेल्या नातेवाइकांना बाहेर काढतात; पण हा कैदी रुग्ण दाखल झाल्यानंतर या वॉर्डात एकही सुरक्षारक्षक ६-७ तास फिरकलेच नाही. त्यानंतर त्या कैद्याला सायंकाळी कैद्यांच्या वॉर्डात नेण्यात आले. त्यानंतर सुरक्षारक्षक तपासणीसाठी वॉर्डात आले आणि त्यांनी एकापेक्षा अधिक नातेवाइकांना रुग्णालयातून अक्षरश: हाकलून दिले.
कैद्याला खायला पराठा, चिकन मसाला अन् बिर्याणी
उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या या कैद्याला त्याच्या मित्रांनी पराठा, चिकन मसाला आणि बिर्याणी आणून दिल्याचे पाहायला मिळाले. रुग्णालयात कोणालाही तंबाखू खाऊ दिली जात नाही. कोणाकडे तंबाखू सापडली तर रुग्णालय कर्मचारी वॉर्ड डोक्यावर घेतात; पण हा कैदी सर्वांसमोर तंबाखू खात असतानाही त्याला कोणी हटकले नाही.
परिचारिकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष
या कैद्याला भेटायला येणाऱ्यांची गर्दी होती. कैदी रुग्णाजवळ इतकी गर्दी पाहून तेथे काम करणाऱ्या एका परिचारिकेने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना व कर्मचाऱ्याला सर्वांना बाहेर घालवायला सांगितले; परंतु दोघांनीही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.
बापू नायरने ससूनमध्ये रचला होता खुनाचा कट
कुख्यात गुन्हेगार बापू नायर याला ससून रुग्णालयात दाखल केले असताना त्याने साथीदारांना बोलावून शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर यांच्या खुनाचा कट रचला होता. हे तपासात उघडकीस आल्यानंतर नायर याच्या बंदोबस्ताकामी नेमलेल्या ६ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. असे असतानाही पोलीस कैद्यांना नातेवाइकांना भेटू देत असल्याचे दिसून येत आहे.