पुणे - गेन बिटकॉईन प्रकरणातील आरोपींना मिळालेला नफा त्यांनी वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून त्यांत फिरवला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे़ विशेष न्यायालयाने तिघांच्या पोलीस कोठडीत ८ मेपर्यंत वाढ केली आहे़हेमंत चंद्रकांत भोपे (वय ४६, रा़ डीएसके विश्व, धायरी), हेमंत विश्वास सूर्यवंशी (वय ५१, रा़ बाणेर) आणि पंकज श्रीनंदकिशोर आदलाखा (वय ४०, रा़ जनकपुरी, नवी दिल्ली) अशी त्यांची नावे आहेत़ दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे़ या तिघांची पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना शनिवारी न्यायालयात आणण्यात आले होते़हेमंंत सूर्यवीश हे पुणे व महाराष्ट्रातील मुख्य सूत्रधार असून, त्यांनी किती लोकांची गुंतवणूक स्वीकारली, याचा तपास करायचा आहे़ हेमंत भोपे यांच्या ई-मेलवरून गुंतवणूकदारांचे व मुख्य आरोपी यांच्याशी ई-मेलद्वारे संभाषण झालेले असल्याचे दिसून येते़ आरोपींनी गेनबिटकॉईन, जीबी २१ या वेबसाईटवर आयडी तयार करून त्यावर गुंतवणूक घेतली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे़ त्याचा तपास करणे आवश्यक आहे़ आरोपींनी मिळालेला नफा हा वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून फिरवला असल्याची शक्यता असल्याने तपास करायचा असल्याचे पोलिसांनी सांगितले़ आरोपींच्या वतीने त्यांच्याकडून काहीही हस्तगत करायचे नसल्याने त्यांना परत पोलीस कोठडी देण्याची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले़ त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश आऱ एच़ मोहंमद यांनी तिन्ही आरोपींची पोलीस कोठडी ८ मेपर्यंत मंजूर केली़पोलिसांनी सांगितले, की आरोपी गुन्ह्याच्या तपासात कोणतीही मदत करीत नाहीत़ गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास भाग पाडून मिळविलेला नफा त्यांच्याकडून हस्तगत करायचा आहे़
बिटकॉईनचा नफा फिरवला, तिघांच्या पोलीस कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 4:19 AM