बारामती: कर्नाटक येथील विजापूर जिल्ह्यात पंधरा दिवसापूर्वी कबड्डीच्या खेळाडूंच्या वाहनाचा अपघात झाला होता. या अपघातातील गंभीर जखमी असणारा खेळाडू वैभव मोहिते (रा. कळंब) याचे मंगळवारी (दि. ६) सकाळी आठच्या दरम्यान पुणे येथे खासगी रूग्णालयात उपचार दरम्यान निधन झाले. वैभवने २१ दिवस मृत्यूशी झुंज दिली.
याआधी महादेव आवटे व सोहेल सय्यद या दोन खेळाडूंचा अपघाता दरम्यान मृत्यू झाला असनाताच आता वैभवचा देखील मृत्यू झाल्याने कळंब परिसरावर शोककळा पसरली आहे.
कळंब येथील महाराणा कबड्डी संघातील खेळाडुंच्या तवेरा गाडीला विजापूर येथे दि. १७ मार्च रोजी पहाटे ५ च्या सुमारास अपघात झाला होता. या अपघातामध्ये महादेव आवटे (रा. भवानीनगर), सोहेल सय्यद (रा. कळंब) या दोघांचा मृत्यू झाला. कब्बडी खेळाच्या प्रेमापोटी हे खेळाडू अगदी शेतमजुरी करून उपजिविका करीत राष्ट्रीय पातळीपर्यंत नावाजले गेले होते.
या अपघातामधून सुदैवाने बचावलेल्या मात्र गंभीर जखमी झालेल्या वैभव मोहिते याच्यावर दर्जेदार उपचार करण्यासाठी पुणे येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले होते. वैभवचे वडील बापू मोहिते यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. उपचाराचा खर्च देखील मोठा असल्याने त्यांच्यावर संकट ओढावले होते. त्यामुळे आर्थिक मदतीसाठी आवाहन देखील कब्बडीपट्टू व क्रीडा प्रेमींनी केले होते. मात्र २१ दिवस मृत्यूशी सुरू असलेली वैभवची झुंज अखेर थांबली. मंगळवारी (दि. ६) सकाळी आठच्या दरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.-------------------