जलपर्णीमुळे पाण्याचा प्रवाह अडला जावून तो या बंधाऱ्याला नुकसान करण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे या ठिकाणची वाहतूक व्यवस्था कोलमडणार आहे. पावसाच्या पाण्यामुळे मुळा-मुठा नदीच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने बिवरी - कोरेगाव मूळ येथील बंधारा पाण्याखालीच जाणार नाही तर पाण्याच्या दाबाने वाहून जाण्याची भीती बिवरीचे माजी उपसरपंच सुनील गोते व कोरेगाव मूळचे माजी उपसरपंच लोकेश कानकाटे यांनी व्यक्त केली.
या बंधाऱ्याला कठडे नसल्याने अपघात होऊन कोणी या पाण्यात वाहून गेला का? जलपर्णीत गुंतून बुडून गतप्राण झाला हे पण कळणार नाही, अशी अवस्था झाली आहे. बंधाऱ्यावरील रस्त्याच्या पृष्ठ भागातील लोखंडी सळया उघड्या पडल्या आहेत, त्यामुळे पण मोठे अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत पाटबंधारे खात्याकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याची खंत नागरिक बोलून दाखवीत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून बिवरी-कोरेगाव मूळ येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्या जवळील नदीपात्रात प्रचंड प्रमाणात जलपर्णी व झाडेझुडपे वाढल्याने व मुळातच ताकद कमी झालेल्या बंधाऱ्याचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे या बंधाऱ्यावरून जाणारे विद्यार्थी, शेतकरी व नागरिक यांची अडचण होणार आहे. बिवरी, शिरसवडी, अष्टापूर येथील रहिवाशांना उरुळी कांचन येथे येण्यासाठी भवरापूर येथील पुलाचा वापर करावा लागणार असल्याने सुमारे १० ते १२ किलोमीटरच्या अंतराचा वळसा घालावा लागणार आहे.