नीरा : नीरा (ता. पुरंदर) येथे भर बाजारपेठेत दुपारी चार वाहनांचा विचित्र अपघात झाला सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. दोन्ही दुचाकिंचे प्रचंड नुकसान झाले आहे. भर बाजारपेठेत हा अपघात झाल्याने नागरिकांमध्ये मात्र मोठी घबराट निर्माण झाली होती.
याबाबत प्रत्यक्षदर्शी लोकांनी दिलेली माहिती अशी की, सोमवार दि. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता निरेतील मुख्य बाजार पेठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बुवासाहेब चौक दरम्यान सातारा येथे राहणारे तनवीर शेख हे इनोव्हा कार (एम.एच ११- ए.के-५९७१) मधून बारामतीकडे चालले होते. कारमध्ये चालक बरोबर बसलेल्या मुलाने कारचे स्टेअरिंग अचानक वळवले आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या (एम.एच - १२ एम.आर. ८५९९) कारला धडकली.
धडक इतकी जोरदार होती की, त्या धडके नंतर कार २० फुट पूढे फुटपाथवर ढकलली गेली. त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या (एम.एच-१२ एच.के ७५ व एम.एच - १२- पी. आर. २५८६) दोन दुचाकी देखील कारच्या खाली आल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले. अपघातानंतर स्थानिक लोकांनी तातडीने मदत करून इनोव्हा मधील लोकांना बाहेर काढले. दरम्यान नीरा पोलिसांनी घटनास्थळी धावा घेऊन वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी इनोव्हाच्या चालकाला ताब्यातील इनोव्हा ताब्यात घेतली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.