लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘देशाला स्वातंत्र्य मिळतानाच निर्माण झालेल्या पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानात कधीच एकात्मभाव निर्माण झाली नाही. सोळाशे किलोमीटर अंतरावर असलेल्या पश्चिम पाकिस्तानची संस्कृती पूर्व पाकिस्तानातील बंगाली जनतेने स्वीकारली नाही. उर्दू ही देशाची राष्ट्रभाषा म्हणून देखील बंगाली जनतेला मान्य नव्हती कारण त्यांना फक्त बंगालीच भाषा येत होती. त्यामुळे बांगलादेश स्वातंत्र्य युद्धाची बीजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळत असताना झालेल्या फाळणीत रोवली गेली, असे प्रतिपादन ‘कॅस’चे उपसंचालक मेजर जनरल शिशिर महाजन (निवृत्त) यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सेंटर फॉर अडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘विजय दिवस-एक दृष्टीक्षेप ७१’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेफ्टनंट जनरल बी. टी. पंडित (निवृत्त) होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि सेंटर फॉर अडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) चे संचालक एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, ब्रिगेडिअर अजित आपटे (निवृत्त) आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे उपस्थित होते.
महाजन म्हणाले की, ‘श्रीनगरजवळील हजरतबल येथील मशिदीमधून प्रेषित महमंद यांचे पवित्र अवशेष डिसेंबर १९६३ मध्ये चोरी झाले. त्यावेळी पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान पूर्व पाकिस्तानात ढाका येथे होते. त्यांनी या घटनेसाठी भारताला दोषी ठरवले. परिणामी जानेवारी १९६४ मध्ये पूर्व पाकिस्तानात फार मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला, बंगाली हिंदूंना लक्ष्य केले गेले आणि त्यामध्ये प्रामुख्याने उच्चशिक्षित बंगाली हिंदू होते. बंगाली मुस्लिमांनी मार्च १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तानातील पश्चिम पाकिस्ताने समर्थक असलेल्या बिहारी मुस्लिमांचे हत्याकांड केले. त्यामुळे पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल टिका खान यांनी पूर्व पाकिस्तानात कारवाई केली. मुजीब-उर-रहमान यांना अटक करण्यात आली आणि त्यांना पश्चिम पाकिस्तानात तुरूंगात डांबण्यात आले. याविरोधात तेथे मुक्तीवाहिनीची स्थापना झाली. भारताने त्याला पाठबळ दिले. बांगलादेशच्या या स्वातंत्र्य युद्धात रशियाने भारताला पाठिंबा दिला, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत आपला नकाराधिकार वापरला. रशियाच्या या भूमिकेमुळे चीनला शह बसला आणि तो पाकिस्तानच्या मदतीला आला नाही.
ब्रिगेडिअर अजित आपटे (निवृत्त) यांनी आपल्या भाषणात सांगितले, ‘बांगला देशचे स्वातंत्र्य युद्ध १४ दिवस सुरू होते असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात ते ९० दिवस सुरू होते. १९७१ सालच्या डिसेंबर महिन्यात अधिकृतपणे ते सुरू झाले परंतु सप्टेंबर महिन्यातच खऱ्या अर्थाने त्याची सुरवात झाली होती. भारतीय लष्कराने बांगलादेश मुक्ती वाहिनीला मदत करून युद्धाची पूर्वतयारी केली होती.
लेफ्टनंट जनरल बी. टी. पंडित (निवृत्त) म्हणाले की, हे युद्ध पाकिस्तानच्या भूमीवरच लढायचे, त्यांना आपल्या सीमेच्या आत येण्याची संधी द्यायची नाही आणि जम्मू-काश्मीरशी संपर्क अखंड राहील याची पूर्णपणे खबरदारी घ्यायची ही ध्येय त्यावेळी डोळ्यासमोर होती. मुक्तीवाहिनीची फार मोठी मदत झाली, पण भारतीय जनतेने दिलेल्या अभूतपूर्व पाठिंब्यामुळे सैन्यदलांचे आत्मिक बळ प्रचंड वाढले होते. पाकिस्तानला संपवण्याची भावना प्रत्येक सैनिकात निर्माण झाली होती.ह्व एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) प्रास्ताविकात म्हणाले की, युद्धात मिळालेल्या विजयातूनही शिकायला मिळते, ते कळावे म्हणून विजयी योद्ध्यांप्रमाणेच तेव्हा युद्धकैदी झालेल्यांनाही या व्याख्यानमालेसाठी निमंत्रित करण्यात येणार आहे.
डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले. लीना चांदोरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
चौकट
अजूनही पाकच्या तुरुंगात
भारतीय फौजांच्या अतुलनीय पराक्रमामुळे ९३ हजार पाक सैनिक युद्धकैदी बनले. त्यांना भारताने माणुसकीची वागणूक दिली, कारण ती आपली संस्कृती आहे. त्यांना भारताने नंतरच्या काळात मुक्त केले परंतु त्याबदल्यात भारताच्या पदरात काहीच पडले नाही. पाकिस्तानच्या ताब्यात आजदेखील भारतीय युद्धकैदी आहेत मात्र पाकिस्तान ते मान्य करत नाही.
- मेजर जनरल शिशिर महाजन (निवृत्त)