पुणे: भारतीय राज्यघटना हीच भारतीय जनतेचा प्राण आणि स्वाभिमान आहे. मात्र, ही राज्यघटना बदलण्यासाठी आणि देशातील लोकशाही उद्ध्वस्त करून हुकूमशाही आणण्यासाठी भाजपने ‘चारशे पार’ची घोषणा केली आहे, असा आरोप ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.
या लोकसभा निवडणुकीनंतर देश एकत्र राहणार की नाही, देशात संविधान राहणार की नाही आणि देशात लोकशाही राहणार की हुकूमशाही येणार, हे ठरवणारी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष व निवडणूक प्रचार प्रमुख मोहन जोशी, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी उपस्थित होते.
डॉ. मुणगेकर म्हणाले, नोटबंदी व जीएसटीची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने केली. जीएसटीचे विधेयक २००९ पासून पडून होते, तेव्हा भाजप शासित राज्यांनी विरोध केला. तेच विधेयक भाजपची केंद्रात सत्ता आल्यावर मंजूर केले आणि त्यांची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने केली जात आहे. मोदींच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात आर्थिक दर व विकासाचा दर घसरला आहे. त्यामुळे भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था होण्याची घोषणा धादांत खोटी आहे. भारतामध्ये नवा फॅसिजम सुरू आहे. निवडणूक आयोग नरेंद्र मोदी यांच्या दबावाखाली आहे, असे डॉ. मुणगेकर यांनी सांगितले.