शहरातील लसीकरणाचे श्रेय मिळविण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी भाजप पालिका प्रशासनाला हाताशी धरून उपलब्ध लसीच्या पुरवठा शहरातील केंद्राना करताना दुजाभाव करत आहे. त्यामुळे, एक प्रकारे सत्ताधारी भाजप ठराविक भागातील लोकांच्या जिवाशी खेळत असून लसीकरणाचे हे घाणेरडे राजकारण तातडीनं थांबविण्यात यावे अशी मागणी महापालिकेतील विरोधीपक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे. धुमाळ यांच्या प्रभागात असलेल्या गंगाबाई धुमाळ उद्यानातील लसीकरण केंद्रात मागील 15 दिवसांपासून एकदाही पालिकेच्या आरोग्य विभागाने लस पुरविलेली नाही. त्यामुळे या केंद्रावर रोज शेकडो पुणेकर लशींची वाट पाहून घरी परतत असल्याने धुमाळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शहरावर करोनाचे गंभीर संकट आहे. अशा स्थितीत शहरातील संभाव्य धोका टाळायचा असल्यास वेगाने लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. अशा स्थितीत, सत्ताधाऱ्यांकडून वारंवार राजकारण आणले जात आहे. प्रत्यक्षात शहरातील प्रत्येक नागरिकाला प्राधान्य देणे अपेक्षित असताना तसेच शहरासाठी उपलब्ध होणाऱ्या लसीच वाटप नि:पक्षपातीपणे होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र चित्र उलटे असून अनेक भागातील केंद्रावर लसच दिली जात नसल्याने प्रशासनाकडून व सत्ताधारी भाजपकडून त्यांच्या बाबत दुजाभाव तसेच अन्याय केला जात आहे. लसीकरण वाटपाबाबत विचारले असता वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयातील क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी लस वाटप नियोजन करत असलेल्या अधिकाऱ्यांकडे बोट दाखवत आहेत. तर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता ते महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बोट दाखवित आहेत.
वाटपात जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण करून ठराविक केंद्रावर लस पाठवून लसीकरण वाटपातही गलिच्छ राजकारण केलं जात असल्याचा आरोप धुमाळ यांनी केला आहे.