पुण्यात भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले; जय श्रीराम vs अजितदादांच्या घोषणांनी सभागृह दणाणले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 06:12 PM2021-01-01T18:12:14+5:302021-01-01T18:37:17+5:30
या कार्यक्रमासाठी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.
पुणे : पुणे महापालिकेच्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’ चा ऑनलाईन लोकार्पण सोहळा पुण्यात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर उपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकत्यांमध्ये जबरदस्त उत्साहाचे वातावरण होते. या आगामी काळातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमात हे दोन दिग्गज नेते एकत्र येत असल्याने राजकीय फटकेबाजी अनुभवायला मिळण्याची शक्यता होती. पण या कार्यक्रमादरम्यान भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भिडल्याने कार्यक्रमात पुरता गोंधळ उडाला.
पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पुणे महापालिकेच्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’ चा ऑनलाईन लोकार्पण सोहळा कार्यक्रमात एकत्र आले होते. या कार्यक्रमासाठी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यानी पुण्याची ताकद गिरीश बापट, जय श्रीराम च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी आक्रमक रूप धारण करून मग एकच वादा अजितदादा यांसारख्या जोरदार घोषणा दिल्या. यानंतर परिसरात पुरता गोंधळ उडाला व काहीवेळ तणावाचे वातावरण देखील निर्माण झाले. पण पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांत केले. त्यानंतर कार्यक्रम पुन्हा सुरु झाला.
‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’ चा ऑनलाईन लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. हा सोहळा महापालिकेच्या नवीन इमारतीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुपारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ , महापालिका आयुक्त विक्रम कुमार , जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
भामा आसखेड प्रकल्पाचे श्रेय घेण्यावरुन गेल्या काही दिवसांपासून जोरदार वाद सुरु आहे. याच वादावरुन हे कार्यकर्ते भिडले असावे अशीं चर्चा आहे.मात्र अदयाप तरी ठोस कारण समोर आलेले नाही.
पवार- फडणवीस यांच्या एकत्र येण्याची जोरदार चर्चा..
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील वर्षी पहाटेच्या वेळी अचानक शपथविधी उरकून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली होती. मात्र ते सरकार अवघ्या ८० तासांसाठी अस्तित्त्वात राहिले. त्यानंतर पुन्हा अजित पवारांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तेव्हापासून अर्थ खात्याची महत्वाची जबाबदारी सांभाळत पवार यांचे काम धडाक्यात सुरु आहे. पण आज पुण्यात पुन्हा एकदा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती.