मंचर (पुणे) : जे विचारांना बांधील नाही, ज्यांनी चुका केल्या आहेत ते भाजपमध्ये जात आहेत. स्वाभिमानी मराठी माणसे भाजप सोडून इतर पक्षात आहेत. भाजप व स्वाभिमानाचा दूरदूरचा संबंध नाही, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली. बाळहिरडा प्रश्नावरून त्यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका केली.
रोहित पवार मंचर येथे आले असता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप पक्ष प्रवेशाबाबत विचारले असता पवार म्हणाले, भाजपकडे सत्ता तसेच पैसा आहे. दबावामुळे काही नेते भाजपत गेले आहेत. पुढील काळात काही नेते तसेच आमदार भाजपत जातील, असे बोलले जाते. विचारांना जे बांधील नाही, ज्यांनी चुका केल्या आहेत ते भाजपत जात आहेत, असे सांगून पवार म्हणाले, अनेक लोकांशी संपर्क केला जाईल. मात्र, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला जे बांधील आहेत ते आहे तिथेच राहतील. स्वाभिमानी मराठी माणसे भाजप सोडून इतर पक्षात आहेत.
भाजप व स्वाभिमानाचा दूरदूरचा संबंध नाही असे सांगून ते म्हणाले, आम्ही आमच्या पातळीवर लढत राहू. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर आज जे आहेत ते कुठेही जाणार नाहीत. खासदार अमोल कोल्हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर जाणार असल्याची चर्चा आहे. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ही केवळ चर्चा असून लोकांमध्ये अशा चर्चा कोण घडवून आणतो ते आपल्याला माहिती आहे. भाजपच राजकीय पुड्या सोडत असते. अमोल कोल्हे यांच्याबाबत या हवेतील गप्पा सुरू आहेत. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढावी लागेल अशीसुद्धा चर्चा सुरू आहे, असे रोहित पवार म्हणाले.