पुणे : महापालिका निवडणुकीसाठी सगळेच राजकीय पक्ष व त्यांचे इच्छुक उमेदवारही गाजावाजा करीत तयार होत असताना भारतीय जनता पार्टीने मात्र आपल्या इच्छुक उमेदवारांना मुलाखतीसाठी येताना फक्त एकट्याने व अगदीच आवश्यक असेल तर केवळ एका समर्थकालाच बरोबर आणण्यास बजावले आहे. तशा आदेशाचे शहराध्यक्षांच्या स्वाक्षरीचे पत्रच पक्ष कार्यालयात नोटीस बोर्डवर लावण्यात आले आहे.रस्त्याने शक्तिप्रदर्शन करत यायला तर सक्त मनाई करण्यात आली आहे. नागरिकांना त्रास होईल अशी कोणताही गोष्ट केली असल्याचे आढळल्यास पक्षाकडून त्याची योग्य ती दखल घेतली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. शहरात सध्या सर्वाधिक मागणी भाजपालाच असल्याचे दिसते आहे. उमेदवारी अर्ज नेण्याचा त्यांचा सोमवारी अखेरचा दिवस होता. सायंकाळी ५ वाजेपर्यंतचीच वेळ होती, मात्र कार्यकर्त्यांची गर्दी व आग्रहामुळे ती रात्री ८ पर्यंत करण्यात आली. साधारण १ हजार ६८ अर्ज सायंकाळी ५ पर्यंत नेण्यात आले होते, अशी माहिती देण्यात आली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ४ जानेवारीला पुण्यात येणार असून, काही वेळ थांबणार आहेत. त्या वेळी पक्षात आणखी काही जणांचा प्रवेश होणार असल्याचे संकेत गोगावले यांनी दिले. त्यांची नावे आताच जाहीर करता येणार नाहीत, असे ते म्हणाले. लवकरच पक्षसंघटनेच्या वतीने प्रभागनिहाय नियुक्त केलेल्या बूथ कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती गोगावले यांनी दिली. (प्रतिनिधी)
शक्तिप्रदर्शनाला भाजपाची मनाई
By admin | Published: January 03, 2017 6:38 AM