पुणे: भाजपने खासदार गिरीश बापट यांना आजारी असतानाही प्रचारात आणले, ही संतापजनक बाब आहे. केवळ मतांच्या राजकारणासाठी भाजपने हे कृत्य केले, अशी टीका काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांनी केली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी विविध ठिकाणी कोपरा सभा घेण्यात आल्या. त्यावेळी बागवे बोलत होते. आमदार संग्राम थोपटे, हाजी दादू सेठ खान, नदीम खान, शिवसेनेचे संदीप गायकवाड, सुरेश लोखंडे आदींची भाषणे झाली.
काँग्रेसने जनतेच्या हितासाठी ज्या योजना आणल्या. नावे बदलून त्याच याेजना हे सरकार राबवीत आहे, असे नदीम खान म्हणाले. निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा असून कट्टर शिवसैनिक आता पेटून उठला आहे, असे शिवसेनेचे संदीप गायकवाड यांनी सांगितले.
कसबा विकास परिषद आयोजित करणार
गेली ३० वर्षे भाजपने कसब्यात मतदारसंघाचा विकास केला नाही हे सत्य आहे. मला स्वतःला येथील प्रश्नांची जाणीव असून कसब्याच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार करणार आहे. रस्ते, वाहतूक, पाणीपुरवठा, मलनिस्सारण प्रकल्प, उद्याने, पार्किंग, जुन्या वाड्यांचा प्रश्न, सिग्नल व्यवस्था, भाजी मंडई, शाळा व क्रीडांगणे या नागरी सुविधांबरोबर मतदारसंघातून जाणाऱ्या मेट्रो प्रकल्पामुळे निर्माण होणारे प्रश्न या सर्वांवर सविस्तर चर्चा करून उपाय शोधणे, कसब्याच्या विकासाचा स्वतंत्र विकास आराखडा करणे, कसबा विकास परिषद भरून नागरी प्रश्न सोडवण्यावर भर देईन, असे धंगेकर म्हणाले.
या मतदारसंघातील तरुण-तरुणींना चांगला रोजगार मिळेल यासाठी नोकरी महोत्सव, बेरोजगार नोंदणी कक्ष स्थापन करणे, बचत गटांची साखळी निर्माण करणे आदींसाठी कसोशीने प्रयत्न करेन. विकासासाठी ‘कसबा विकास पॅकेज’ राज्य शासनाकडे मागितले जाईल, असेही धंगेकर यांनी सांगितले.