पुणे : शिवाजीनगर, खडकवासला, पुणे कॅन्टोन्मेंट आणि पर्वती या विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपच्या उमेदवारांनी साेमवारी (दि. २८) अर्ज दाखल केला. या चारही ठिकाणी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे हजर नव्हते. त्यामुळे घाटे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
शिवाजीनगर मतदारसंघातून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे, खडकवासलामधून भीमराव तापकीर, पुणे कॅन्टोन्मेंटमधून सुनील कांबळे, पर्वतीमधून माधुरी मिसाळ, कसब्यातून हेमंत रासने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी चारही ठिकाणी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे हजर नव्हते.
कसबा विधानसभा मतदारसंघात दीड वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत हेमंत रासने यांचा काँग्रेस पक्षाचे रवींद्र धंगेकर यांनी पराभव केला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, हेमंत रासने आणि दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक या तिघांनी मतदारसंघातून तयारी सुरू केली होती. या तिघांपैकी एकाला संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र पुन्हा एकदा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हेमंत रासने यांच्यावर विश्वास दाखवित कसबा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यामुळे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी नाराज होऊन ‘तुम्हाला हिंदुत्ववादी सरकार हवंय; पण ३० वर्षे हिंदुत्वासाठी देणारा कार्यकर्ता उमेदवार म्हणून नकोय…’ अशी पोस्ट सोशल मीडियावर केली होती. ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यातच चार विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांचे अर्ज दाखल करताना घाटे हजर नसल्याने चर्चांना उधाण आले आहे.