पुणे: छत्रपती संभाजी महाराजांचे वढू बुद्रुकमध्ये स्मारक व्हावे यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच मोठी आर्थिक तरतूद केली. महाविकास आघाडीला ते श्रेय मिळू नये यासाठी भाजपकडून नको ती आदळआपट सुरू आहे, अशी टीका काँग्रेसने केली. पवार यांचे सभागृहात भाषण झाल्यानंतर दोन दिवसांनी कशी भाजपला जाग आली, असा प्रश्नही काँग्रेसने केला.
प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले की, लबाडी करून, शिवसेनेसारखी संघटना फोडून भाजप राज्यात सत्तेवर आला आहे. त्यांना कोणालाही कशाचे श्रेय मिळालेले चालत नाही. सतत वाद निर्माण करून त्याकडेच लक्ष वेधून घेऊन त्यांना आपली राजकीय घरफोडी झाकायची आहे. त्यामुळेच पवार यांचे भाषण सभागृहात झाले. त्यावेळी भाजपचा एकही आमदार काहीही बोलला नाही. दोन दिवसांनी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जाग आणून दिली व त्यानंतर पवार यांच्यावरची टीका सुरू झाली. हा सगळा प्रकार अतिशय निंद्य आहे.