पुणे : सुरक्षा रक्षक म्हणून बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ व मारहाण प्रकरणात भाजप नगरसेवकासह सहा जणांची जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत भा. सिरसाळकर यांनी निर्दोष मुक्तता केली. सिंहगड रोड, हिंगणे खुर्द, प्रभागातील भाजपचे नगरसेवक श्रीकांत जगताप, अनिकेत राजेंद्र जगताप (वय ३२), हेमंत रत्नाकर जगताप (३८), महेश आनंदराव काटे (३७), जयनाथ वसंतराव जगताप (४६) व शैलेश सोनबा चव्हाण (सर्व रा. हिंगणे खुर्द, सिंहगड रोड) अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत. ॲड. मिलिंद द. पवार यांनी आरोपींच्या बाजूने युक्तिवाद केला.
४ जून २०१२ रोजी सरकारी गाडीवर सुरक्षा रक्षक म्हणून बंदोबस्तावर असलेले पोलिस कर्मचारी अमित संपत पवार (४५, हे सिटी पोस्ट, पुणे) पोस्ट खात्याची रोकड रक्कम घेऊन सिंहगड रोड येथील आनंदनगर, हिंगणे खुर्द पोस्ट ऑफिसमध्ये सरकारी गाडी घेऊन आले असताना, पोस्टाची सरकारी गाडी पार्किंग करण्याच्या कारणावरून बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचारी अमित पवार व पोस्टचे काही कर्मचारी यांना अनिकेत जगताप यांनी अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर अनिकेत जगताप यांनी नगरसेवक श्रीकांत जगताप व इतर साथीदारांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. पोलिस कर्मचारी पवार यांना वरील सर्वांनी मारहाण केली. त्यातील दोघा- तिघांनी गाडीतील कॅश घेण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद हवेली पोलिस ठाण्यात दिली होती. आरोपींवर भादंवि १४३, १४७, १४९, ३५३, ३२३, ३३६, २४९, ५०४, ५०६, २९४ अन्वये कलमे लावून भाजपचे नगरसेवक श्रीकांत जगताप व त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला होता.
सरकारी पक्षाने तिघांची साक्ष न्यायालयात नोंदविली. घडलेला घटनाक्रम साक्षीदारांनी न्यायालयासमोर जसा घडला तसा शपथेवर कथन केला. राजकीय वैमनस्यातून पोलिस कर्मचारी पवार यांना खोटी फिर्याद देण्यास काही तत्कालीन नेत्यांनी भाग पाडले व श्रीकांत जगताप यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना या खटल्यामध्ये खोटे गुंतविले आहे, असा युक्तिवाद ॲड. मिलिंद द.पवार यांनी केला. या खटल्यामध्ये ॲड. पवार यांना ॲड.आकाश देशमुख व ॲड. सुयोग गायकवाड यांनी साहाय्य केले.