पुणे : भाजपचे गुरुवार पेठ परिसरातील नगरसेवक सम्राट थोरात यांचा लग्न सोहळ्यातला फोटो विनापरवानगी इंटरनेटवरील भारतमेट्रीमोनी या विवाह संस्थेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला. या विवाह संस्थेविरुद्ध सम्राट थोरात यांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे. वाय. एस. पैठणकर न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत खडक पोलिसांना प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. नगरसेवक सम्राट थोरात यांचा १५ मे २०१५ रोजी ऐश्वर्या अजय भोसले यांच्या विवाह सोहळा झाला होता. त्या सोहळ्यातील एक फोटो भारत मेट्रीमोनी या इंटरनेटवरील संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर अपलोड करण्यात आला. सर्वप्रथम ही घटना अतुल भिसे यांच्या निर्दशनास आले. त्यांनी ही बाब तातडीने थोरातांच्या लक्षात आणून दिली. भिसे हे थोरात यांचे मित्र आहे. या विवाह संस्थेने आम्ही प्रतिष्ठित घरातील मुला मुलांचे लग्न जमवतो हे भासविण्यासाठी हे कृत्य करण्यात आले असल्याचे समोर आले आहे. ही घटना उघडकीस आल्यावर थोरात यांनी अॅड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेत भारत मेट्रीमोनी या संस्थेविरुद्ध खटला दाखल केला. न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करुन तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश खडक पोलिसांना दिले आहे. फिर्यादींच्या राजकीय प्रसिद्धीचा फायदा उचलण्यासाठी हे कृत्य केले आहे. या बाबतीत थोरात यांनी आपले लग्न या संस्थेमार्फत झाले नसून संस्थेकडून आपली फसवणूक करण्यात आली आहे, असे तक्रारीत नमूद केले आहे.
भाजप नगरसेवकाच्या लग्नातला फोटो विनापरवानगी झळकला भारत मेट्रीमोनीच्या संकेतस्थळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 6:15 PM
भारत मेट्रीमोनी विवाह संस्थेने आम्ही प्रतिष्ठित घरातील मुला मुलांचे लग्न जमवतो हे भासविण्यासाठी हे कृत्य केले असल्याचे समोर आले आहे.
ठळक मुद्देयाप्रकरणाची चौकशी करुन तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचा आदेश