भाजपवाले पुणेकरांचे गुन्हेगार; २ खासदार, ८ आमदार, महापालिकेत १०० नगरसेवक यांनी शहरासाठी काय केले?
By राजू इनामदार | Published: May 30, 2023 06:47 PM2023-05-30T18:47:09+5:302023-05-30T18:47:16+5:30
एकही योजना पूर्णत्वाला नाही, मेट्रो अर्धवट, जायका कागदावर, समान पाणी योजना निविदांच्या भ्रष्टाचारात सापडली
पुणे: केंद्र सरकारच्या कारकिर्दीला ९ वर्षे झाली म्हणून भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील पदाधिकारी ढोल वाजवत आहेत. मात्र दोन खासदार, आठ आमदार व महापालिकेत १०० नगरसेवक दिलेल्या पुणे शहराला या ९ वर्षात त्यांनी काय दिले त्याचा लेखोजोखा त्यांनी द्यावा असे आव्हान काँग्रेसने भाजपला दिले. भाजपचे सगळे पदाधिकारी पुणेकरांचे गुन्हेगार आहेत असा आरोप करण्यात आला.
पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी काँग्रेसभवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपला लक्ष्य करत त्यांच्यावर टिकेचा भडिमार केला. ते म्हणाले, पुणेकरांनी भाजपला भरभरून राजकीय दान दिले. त्याचा उपयोग भाजपने केला नाही. केंद्रात, राज्यात व शहरातही त्यांचीच सत्ता होती. या सत्ताकालात ना केंद्राने पुण्याला काही दिले, ना राज्यातून आमदारांनी शहरासाठी काही आणले व ना महापालिकेच्या सत्तेतून नगरसेवकांनी काही केले. शहरात सांगावी अशी एकही योजना त्यांनी पुर्णत्वाला नेली नाही. मेट्रो अर्धवट, जायका कागदावर, समान पाणी योजना निविदांच्या भ्रष्टाचारात सापडली.
हा यांच्या सत्तेचा लेखाजोखा काँग्रेस जाणीवपूर्वक केंद्र सरकारच्या ९ वर्षांच्या कारकिर्दीच्या दिवशीच हे प्रश्न उपस्थित करत आहेत असे स्पष्ट करून जोशी म्हणाले, मेट्रोचा प्रस्तावच काँग्रेसचा आहे. त्यानंतर मागील ७ वर्षात यांनी वनाज ते गरवारे हा लहानसा मार्ग सुरू केला, ज्याचा काही उपयोगच व्हायला तयार नाही. जायका नावाच्या नदीसुधार प्रकल्पासाठी घोषणा झाल्या, काम मात्र काहीच झाले नाही. घोषणांचा सुकाळ व कामांचा दुष्काळ असेच या ९ वर्षांचे पुणे शहरासाठीचे वर्णन आहे. यावेळी पक्षाचे शहर प्रवक्ता रमेश अय्यर, ओबीसी विभाग प्रमुख प्रशांत सुरसे, चेतन अगरवाल उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे शहर लोकसभेवर दावा केला आहे याकडे लक्ष वेधले असता जोशी यांनी त्यांची ती सवयच आहे असे सांगितले. शहरातील विविध प्रश्नांवरही राष्ट्रवादी काँग्रेसच आक्रमक असते यालाही त्यांनी काँग्रेससुद्धा सातत्याने आंदोलने करत आवाज उठवत आहे असा दावा केला. आमदार रविंद्र धंगेकर, शहराध्यक्ष अऱविंद शिंदे पक्षाच्या कार्यक्रमात का दिसत नाही या प्रश्नावर जोशी यांनी धंगेकर रस्त्यावर उतरून काम करणारे आमदार आहेत, शिंदे यांनीही अनेक आंदोलने केली आहेत असे सांगितले.