पुणे : युती निश्चित आहे असा दावा करणाऱ्या भाजप आणि शिवसेनेवर शिवसंग्रामचे अध्यक्ष आणि आमदार विनायक मेटे यांनी गंभीर आरोप केले आहेत. युतीच्या बैठकीत घटक पक्षांना विचारातही घेतले जात नसल्याची खदखद त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी १२ जागांची मागणी भाजप व शिवसेनेकडे केल्याचेही स्पष्ट केले.
पुण्यात सोमवारी शिवसंग्राम पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या कार्यक्रमात काही कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेशही केला. या कार्यक्रमानंतर मेटे यांनी माध्यमांशी बातचीत केली. ते म्हणाले की, ' भाजपला खरं महायुती करायची असेल तर त्यांनी सर्वात आधी घटक पक्षांसोबत चर्चा करायला हवी होती, परंतु असे होताना दिसत नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी मित्रपक्षांची जागा वाटप होईल आणि त्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटल्या जातील असे सांगितले होते. मात्र तसे काहीही घडलेले नाही. महायुतीत शिवसंग्राम पक्षाने 12 जागांची मागणी केली आहे. यावर आम्ही मुख्यमंत्र्यांशीही बोलले आहोत मात्र ही चर्चा पुढे सरकत नाही. युती नाही झाली तर शिवसंग्राम स्वतंत्र लढण्यास तयार आहे.. युती झाली आणि इतर घटकपक्ष भाजपच्या चिन्हावर लढले तर आम्हीही भाजपच्या चिन्हावर लढू असा खुलासाही त्यांनी केला.