पुण्याच्या जागेसाठी भाजपचा उमेदवार ठरला, काॅंग्रेसचं काय ?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 06:53 PM2019-03-23T18:53:05+5:302019-03-23T18:56:00+5:30
भाजप शिवसेनेच्या युतीकडून पुण्याच्या जागेसाठी गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु अद्याप काॅंग्रेसकडून पुण्याची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे बापट यांना टक्कर देण्यासाठी काॅंग्रेस काेणाला रिंगणात उतरवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे : पुण्याच्या लाेकसभेच्या जागेवर भाजपा आणि काॅंग्रेसकडून काेणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले हाेते. काल रात्री जाहीर झालेल्या उमेदवारीमध्ये पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विद्यमान खासदार अनिल शिराेळे यांना डावलून बापट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाकडून काेण उमेदवार मिळणार या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असला तरी काॅंग्रेसकडून आता काेणाला रिंगणात उतरवलं जाणार याची उत्सुकता पुणेकरांमध्ये दिसून येत आहे.
पुण्याची लाेकसभेची जागा महत्त्वाची मानली जाते. गेल्या वर्षी या जागेवरुन भाजपाचे अनिल शिराेळे हे निवडून आले हाेते. यंदा लाेकसभेसाठी पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष याेगेश गाेगावले, स्वतः अनिल शिराेळे, आमदार जगदीश मुळीक, भाजपाचे सहयाेगी खासदार संजय काकडे हे इच्छुक हाेते. या सगळ्यांमध्ये काेणाला तिकीट मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले हाेते. गेल्या वेळी शिराेळे यांना गाेपीनाथ मुंडे यांच्या आग्रहास्तव उमेदवारी देण्यात आली हाेती. यंदा बापट यांनी उमेदवारी मिळविण्यासाठी जाेर लावला हाेता. अखेर काल रात्री जाहीर झालेल्या यादीत बापट यांना पुण्याची युतीची उमेदवारी झाहीर झाली.
आघाडीमध्ये पुण्याची जागा काॅंग्रेसकडे आहे. काॅंग्रेस अजून पुण्यासाठी सक्षम उमेदवाराचा शाेध घेत आहे. काॅंग्रेसकडून उमेदवारीसाठी अनेकजण उत्सुक आहेत. त्यात माजी आमदार माेहन जाेशी, पुणे महापालिकेतील काॅंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, माजी आमदार उल्हास पवार हे काॅंग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते इच्छुक आहेत. त्याचबराेबर शेतकरी कामगार पक्षात गेलेले प्रवीण गायकवाड यांनी देखील काॅंग्रेस श्रेष्ठींची उमेदवारीसाठी भेट घेतली हाेती. संजय काकडे हे देखील पुण्याच्या जागेसाठी काॅंग्रेसमध्ये जाण्यास तयार हाेते. गिरीश बापट यांची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांना टक्कर देण्यासाठी काॅंग्रेस काेणाला रिंगणात उतरवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काॅंग्रेसच्या इच्छुकांचा दिल्ली वाऱ्या अजूनही सुरु असून उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु आहे. प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण यांनी पुण्यासाठीच्या ज्या उमेदवारांची नावे राहुल गांधींकडे पाठवली हाेती. त्यात गांधींनी अनेक बदल सुचवले हाेते. पुण्याच्या जागेसाठी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, अशाेक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम यांनी बैठक घेतली हाेती. त्यातूनही अद्याप जागेचा तिढा सुटू शकलेला नाही. त्यात गायकवाडांना राष्ट्रवादीचा पाठींबा आहे. गायकवाड हे संभाजी ब्रिगेडकडून काम करत हाेते. त्याचबराेबर शरद पवारांच्या देखील मर्जीतले मानले जातात. अनेकदा राष्ट्रवादीच्या मंचावर ते दिसून आले आहेत. त्यामुळे गायकवडांना उमेदवारी जाहीर झाल्यास राष्ट्रवादीचा उमेदवार काॅंग्रेसच्या तिकीटावर असे चित्र निर्माण हाेईल. यापूर्वी पुण्यात काॅंग्रेसचे सुरेश कलमाडी हे खासदार हाेते. त्यांच्या इतका सक्षम उमेदवार अद्याप काॅंग्रेसला मिळू शकलेला नाही. आता युतीने उमेदवार जाहीर केल्यामुळे काॅंग्रेसला काेणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय घेणे साेपे झाले आहे.
दरम्यान, आयात उमेदवारांना संधी न देता काॅंग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनाच संधी देण्याची मागणी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. प्रवीण गायकवाड हे पुण्यातून काॅंग्रेसच्या तिकीटावरुन निवडणूक लढविण्यासाठी आग्रही असून त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.