पिंपरी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि बारामती या लोकसभा मतदार संघांवर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका सुरू केल्या आहेत. केंद्रीय आदिवासी मंत्री रेणुका सिंग शिरूरमधील प्रश्न जाणून घेणार आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघात आणि शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. त्या मतदार संघात भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. शिरूर लोकसभा मतदार संघांत १४ ते १६ सप्टेंबरला दौरा होणार आहेत. याविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद झाली. यावेळी निवडणूक प्रभारी माधुरी मिसाळ, संयोजक धर्मेद्र खांडरे, योगेश टिळेकर, अतुल देशमुख, आशा बुचके, शरद बुट्टे पाटील आदी उपस्थित होते.
मिसाळ म्हणाल्या, लोकसभेच्या निवडणूक दीड वर्षांनंतर होणार आहे. प्रवास योजना नियोजन केले आहे. केंद्रीय मंत्री दौरा होणार आहे. सोळा मतदारसंघ आम्ही केंद्राला जिंकून देणार आहोत. सहा विधानसभा दौरा झाला आहे. प्रत्येक ठिकाणी एक समिती नियुक्त केली आहे. २१ कार्यक्रम होणार आहेत. संघटनात्मक कार्यक्रम, योजना लाभार्थी योजना, विचार परिवार समन्वय, आयटी सेल संवाद, माजी सैनिक, वारकरी संवाद होणार आहे. महामार्ग प्राधिकरण आढावा होणार आहे.’
शिरूर मतदारसंघ कोणाला, पक्ष ठरविणार
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटाचा दावा शिरूरवर आहे. मात्र, त्यापूर्वीच भाजपने या मतदार संघात काम सुरू केले आहे. हा मतदार संघ नक्की कोणाला, यावर पत्रकारांनी विचारले असता, मिसाळ म्हणाल्या, ‘निवडणूक कोणतीही असो, किंवा युती कुणाशीही असो. पक्षाच्या वतीने तयारी केली जाते. शिरूर मतदारसंघ कोणाला याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील. याबाबत मी बोलणे योग्य ठरणार नाही.’