Girish Bapat Death, Pune Rickshaw Drivers : पुण्यातील कसबाचे खासदार भाजपा ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे आज निधन झाले. चार दशकांच्या राजकीय कारकीर्दीत गिरीश बापट यांनी संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्रीपद भूषवले. पुण्याच्या राजकारणात गिरीश बापट यांची चांगली पकड होती. त्यांनी पुण्यातील रिक्षावाल्यांबद्दल बनवलेला स्टीकर विशेष चर्चेत राहिला होता.
ए रिक्षावाला नव्हे, अहो रिक्षावाले म्हणा...
भाजपाचेविनोद तावडे यांनी आज बापटांना श्रद्धांजली वाहताना त्यांची रिक्षावाल्याबद्दलच्या स्टीकरची एक महत्त्वाची आठवण सांगितली. "गिरीश बापटांना मी पहिल्या निवडणुकीपासून पाहिले. मी कॉलेजमध्ये असताना त्यांनी ती निवडणूक लढवली होती. त्यानंतर ते सातत्याने आमदार-खासदार म्हणून निवडून आले. मला भविष्यात त्यांच्यासोबत काम करता आले. त्यावेळी त्यांच्यातील कार्यकर्ता आणि नेता मला समजला. मला त्यांच्याबद्दलची सर्वात महत्त्वाची वाटणारी गोष्ट म्हणजे, त्यांनी त्यांच्या कसबा विधानसभा मतदारसंघात एक स्टीकर बनवून घेतला होता. 'ए रिक्षावाला नाही, अहो रिक्षावाले म्हणा'.... अशा आशयाचा तो स्टीकर होता. या मागची त्यांची भावना चांगली होती. कारण जे लोक रिक्षा चालवतात तेदेखील कोणाचे तरी वडील, भाऊ आहेत असा त्यांचा विचार होता," असे तावडे म्हणाले.
"सामान्य माणसाकडे पाहण्याचा दृष्टीकोन त्यांनी आमच्यासारख्या अनेक नेतेमंडळींना दिला. प्रतोद किंवा संसदीय कार्यमंत्री असताना ते सर्व मंत्र्यांच्या पीए लोकांच्या नियमित बैठका घेत असत. त्यांच्या अडीअडचणी समजूत घेत असत. त्यांच्या मुलांच्या किंवा कुटुंबाच्या समस्यांवर त्यांना मदत करत असत. सामान्य माणसाशी 'कनेक्ट' असणारा माणूस हा गिरीश बापटांच्या स्वभावाचा प्लस पॉईंट होतात. त्यांच्या जाण्याने पुण्यात पोकळी निर्माण झाली आहे. सहज कोणाशीही मैत्री करणे आणि कार्यकर्त्याला त्याची चूक न ओरडता समजवून सांगणे, हे त्यांचे गुणवैशिष्ट्य होते," अशा शब्दांत विनोद तावडे यांनी बापटांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली.
रिक्षाचालक आणि गिरीश बापटांचे 'कनेक्शन'
रिक्षा चालक आणि गिरीश बापट यांचे नाते 40 वर्षे जुने होते. ते पहिल्यांदा नगरसेवक झाले तेव्हा पहिली संघटना रिक्षा चालकांची सुरु केल्याची आठवण गिरीश बापट यांनीच २०१८ मध्ये सांगितली होती. 'देश आणि समाज चालविण्यामध्ये मोठ्या पदावर काम करणारी मंडळी जशी महत्वाची आहेत तशीच रिक्षा चालकांसारखी लोकदेखील महत्त्वाचे आहेत. म्हणून त्यांचा उल्लेख ‘ए’ न करता ‘अहो रिक्षावाले’ असा करा,' असे तेव्हाच गिरीश बापट म्हणाले होते. तसेच, त्यांच्या मतदारसंघात त्यांनी तशा आशयाचे स्टीकर्सदेखील बनवून घेतले होते.