पुणे: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न काँग्रेसने आत्तापर्यंत तेरा ते चौदा वेळा केला आहे. ‘भारत जोडो यात्रा’ ही राहुल गांधी यांना प्रोजेक्ट करण्यासाठीच आहे. पण अशा प्रयोगानंतरही काँग्रेसच्या खासदारांची संख्या 40 ते 50 च्या वर जात नाही. शिवाय त्यांचे वर्चस्व असलेल्या राज्याची संख्या एक दोनच्या वर जात नाही, अशी टिका जिल्हयाचे पालकमंत्री आणि च्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रा’चे महाराष्ट्रात आगमन झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, कोणत्याही पक्षाने हार न मानता सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. ही यात्रा सुरू असतानाही सात पैकी पाच जागा भाजपला मिळाल्या, गुजरात आणि हिमाचलमध्येही आगामी काळात असेच दिसेल.
एकनाथ शिंदे यांच्या आमदार व मंत्र्यांना विनाकारण खोका संस्कृतीवरून टार्गेट केले जात आहे. शिवसेना ही आज पहिल्यांदा फोडली का? शिवसेनेतून भुजबळांना, गणेश नाईक, नारायण राणे यांना कोणी बाहेर काढले? महाराष्ट्रात आमदार फोडण्याची, खरेदी करण्याची संस्कृती कोणी सुरू केली? असा प्रश्न विचारून त्यावेळी ‘खोका' नव्हता तर ‘पेटी' शब्द होता. त्यावेळी त्यांना ’पेट्या' दिल्या असतील, असा आरोप पाटील यांनी यावेळी केला.
अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याला कोणाची सहमती नाही. सत्तारांनी माफी मागावी असे मुख्यमंत्र्यांनीही त्यांना सांगितले आहे. त्याप्रमाणे माफी मागितलीही गेली. त्यामुळे दिलगिरी व्यक्त केल्यानंतर विषय संपवला पाहिजे, असे माझे मत आहे, असे पाटील म्हणाले.
राज्यातील राजकीय संस्कृती हा मोठा चिंतेचा विषय झाला आहे. काय बोलायचे, कसे वागायचे याची एक आचारसंहिता सगळ्या पक्षांनी एकत्र बसून बनवायला हवी असे मला वाटते. कोणीतरी हे बनवण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.
’हर हर महादेव' या चित्रपटाला होणा-या विरोधाबाबत बोलताना पाटील म्हणाले की, याविषयी तपशीलवार माहिती आपल्याला नाही. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा टेंभा मिरवणा-यांनी दुस-याच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे कारण नाही. त्यासाठी कायदाही हातात घ्यायची आणि ’हम करे सो कायदा' असेही म्हणण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले.
समझने वालोंको इशारा काफी है
शिवसेना फोडणारे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत का, असे विचारले असता, समझने वालोंको इशारा काफी है. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात टोप्या फेकण्याचे काम केले आहे., ज्याच्या डोक्यावर बसेल ते बसेल.' अशी मिश्किल् टिप्पणी पाटील यांनी केली.