पुणे: ‘महिना होऊन गेला, मी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न करतो आहे. काम व्हायला तयार नाही. आपला प्रशासनावर वचक आहे की नाही?’ असा सवाल सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक जयंत भावे यांनी केला व विरोधकांकडून त्यांना बाके वाजवून दाद देण्यात आली. त्यांच्यानंतर अन्य भाजपा नगरसेवकांनीही त्यांचीच री ओढत प्रशासन ऐकत नसल्याचे सांगत आपल्याच पदाधिकाऱ्यांना घरचा अहेर दिला.भावे यांच्या प्रभागातील एका परिसरात एलईडी दिव्यांचा उजेड त्यावर पिवळा कागद लावून कमी केला होता. नागरिकांनी त्याबाबत भावे यांच्याकडे विचारणा केली. त्यांनी त्यासंबंधी महापालिकेत विचारले. त्या वेळी एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी म्हणून दिव्यांवर पिवळा कागद लावण्यात आल्याचे त्यांना समजले. चित्रीकरण संपले तर मग कागद काढले नाहीत, असे विचारल्यावर कसली तांत्रिक अडचण येत नाही तोपर्यंत राहिला कागद तर काय बिघडले, असे उत्तर त्यांना देण्यात आले.भावे यांनी ही कथा सभागृहात सांगितली व प्रशासनावर आपला वचक नसल्याची टीका केली. नगरसेवकांनी रात्री आपल्या प्रभागात फिरून दिव्यांचा प्रकाश पाहावा अशी प्रशासनाची अपेक्षा आहे का असे ते म्हणाले.चित्रीकरणासाठी परवानगी दिलीच कशी, अशी विचारणा सुभाष जगताप यांनी केली. विद्युत विभागाचे प्रमुख रामदास तारू यांनी हा प्रकार क्षेत्रीय कार्यालय स्तरावर झाला असावा, असे स्पष्ट केले. त्यावर क्षेत्रीय कार्यालयप्रमुखांकडून माहिती घ्या, असे नगरसेवकांनी सांगितले.भावे यांच्यानंतर भाजपाच्याच आणखी काही नगरसेवकांनी असेच प्रश्न उपस्थित केले. पालिकेच्या रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेला बाळासह जीव गमावावा लागला. त्यावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी आरोग्य विभागाच्या कारभारावर टीका केली. वारंवार मागणी करूनही या विभागाकडून कसलेच काम होत नसल्याचे नगरसेवकांनी सांगितले. प्रशासनावर आपला कसला अंकुशच राहिला नाही, असे भाजपच्या नगरसेविका नीलिमा खाडे आणि आरती कोंढरे यांनी सांगितले.
भाजपाला मिळाला घरचा अहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 2:24 AM