नारायणगाव (पुणे) : शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून विषमुक्त अन्न धान्य पिकवणे गरजेचे आहे , कृषी प्रक्रियेवरील उद्योगधंद्यांना चालना द्यावी , शेतकरी हा संशोधक आहे , त्यांनी शेतीपूरक व्यवसायाकडे वळले पाहिजे , असे आवाहन शेतकऱ्यांचा फायदा होईल असा कोणताही निर्णय केंद्र सरकार घेत नाही , केंद्रातील भाजपा सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नारायणगाव येथे केली.
नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा , शिवजन्मभूमीची आम्रगाथा, आंबा उत्पादन मार्गदर्शिका पुस्तक प्रकाशन आणि ग्लोबल कृषी महोत्सव २०२३ समारोप समारंभ प्रसंगी विरोधी पक्षनेते अजित पवार हे बोलत होते. याप्रसंगी श्रीमती एस. आर. केदारी बालकमंदिर, अण्णासाहेब नवरे तांत्रिक शिक्षण केंद्र या नूतन इमारतींचा उद्घाटन अजित पवार , माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले. यावेळी आ. अतुल बेनके, ॲड संजय काळे, बाळासाहेब बेंडे-पाटील, देवदत्त निकम, दिंगबर दुर्गाडे, पांडुरंग पवार, बापूसाहेब भुजबळ, अशोक घोलप, कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन कृषिरत्न अनिल मेहेर, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे ,उपाध्यक्ष सुजित खैरे, कार्यवाह रवींद्र पारगावकर , सर्व संचालक , केव्हीके प्रमुख डॉ. प्रशांत शेटे, शास्त्रज्ञ राहुल घाडगे आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की , शेतकऱ्याचा प्रवास अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक ते भूमिहीन या दिशेने सुरू आहे. शेतकऱ्यांनी राजकारणाकडे लक्ष न देता शेतीवर लक्ष केंद्रित करावे , कृषी महोत्सवासाठी जिल्ह्यातील संस्थांनी पुढाकार घेऊन कृषी विज्ञान केंद्रांना हातभार लावण्याची गरज आहे. भविष्यात ऊसतोडणीसाठी मजूर मिळणे कठीण असल्याने साखर कारखान्यांना हार्वेस्टर देण्यासाठी जिल्हा बँकेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन करून केंद्राने साखर निर्यातीला परवानगी द्यावी , अशी टीका केली.
छगन भुजबळ म्हणाले की, ग्रामोन्नती मंडळ या संस्थेचा पारदर्शक कारभार असून या संस्थेची प्रगती वेगाने होत आहे .या भागातील शेतकरी प्रयोगशील आणि वाखाणण्याजोगी आहे , असे गौरवोद्गार भुजबळ यांनी काढले .
प्रास्ताविकात अनिल मेहेर म्हणाले की, द्राक्ष निर्यातीसाठी केंद्र सरकारने विशेष उपाययोजना कराव्यात , शेतमाल वितरण व्यवस्था व्हावी , नव्या आदेशानुसार आता सहापट पाणीपट्टी आकारणीचा निर्णय रद्द करावा , जुन्नर तालुका बिबट प्रवण क्षेत्र असल्याने शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करावा अशी मागणी करून कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवक शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे काम करीत असल्याचे नमूद करीत. सूत्रसंचालन प्रा. महेबूब काझी , प्रा. सुनील ढवळे यांनी केले . रवींद्र पारगावकर यांनी आभार मानले.