मुंबई - गेल्याच आठवड्यात शिवसेनेसोबतच्या युतीबद्दल अतिशय आशावादी विधान करणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले. पुढील निवडणुकांमध्ये भाजपसोबत कोण असेल, कोण नसेल याबद्दल पाटील यांनी अतिशय स्पष्ट विधान केलं आहे. तसचे, 2024 विधानसभा होईल, तेव्हा सरकार स्वबळावर येईल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता पाटील यांनी सडकून टीका केली. नाव मोठं लक्षण खोटं, अशा शब्दांत पाटील मुख्यमंत्र्यांवर बरसले. काही पक्ष आपल्यासोबत प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष, विनायक मेटेंच्या शिवसंग्राम, महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोतांच्या रयत क्रांती संघटनेचा समावेश होतो. याशिवाय आणखी काही छोटे पक्ष सोबत आहेत. मात्र काही जणांची स्थिती नाव मोठं आणि लक्षण खोटं अशी आहे. ५६ आमदार असताना ते मुख्यमंत्री झाले आहेत, अशा शब्दांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली. तसेच, आगामी निवडणुका जेव्हा होतील, कधी होतील हे मला माहिती नाही. मी भविष्यवेत्ता नाही, राजकीय जाणकार आहे. त्यामुळे, जेव्हा 2024 ला विधानसभा होईल, तेव्हा स्वबळावर आपलं सरकार येईल, अशी तयारी सुरू आहे, असे पाटील यांनी सांगितलं. तसेच, आता युतीमध्ये कुणी नको असेही ते म्हणाले.
पाठीत खंजीर खुपसणारे कोण?
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. पाठीत खंजीर खुपसणारे असं म्हटलं केलं की आधी एकाच नेत्याचा चेहरा डोळ्यासमोर यायचा. मात्र आता पाठीत खंजीर खुपसणारे म्हटल्यावर आणखी एक दुसरा चेहरा नजरेसमोर येतो, अशा शब्दांत पाटील मुख्यमंत्र्यांवर बरसले. यापुढे भाजप सर्व निवडणुका स्वबळावर लढवेल आणि एकट्याच्या जीवावर सत्ता आणेल. आम्हाला युतीत कोणीही नको, असं म्हणत पाटील यांनी युतीबद्दल महत्त्वाचं विधान केलं.
''मोदी आमचे आई-बाप''
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावानं निवडून यायचं आणि मग त्यांच्यावरच उठता बसता टीका करायची असा उद्योग सुरू आहे. सकाळी ब्रश करण्यापूर्वीच मोदींच्या नावानं शिमगा सुरू होतो. मोदी हे आमचे आई बाप आहेत. तुमच्या आई बापाला शिव्या दिलेलं तुम्हाला चालेल का, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.
फडणवीसांनीही सांगितलं होतं मिशन 2024
पुणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्या आशा बुचके यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी बोलताना, मला परकियांनी पराजित केलं नाही. मला स्वकीयांनीच पराजित केलं, छत्रपतींना जसा स्वकीयांकडून त्रास झाला तसाच मलाही झाला, असा आरोप त्यांनी केला होता. आशा बुचकेंच्या पक्षप्रवेशानंतर बोलताना फडणवीस यांनी युतीमध्ये आम्हाला त्रास झाल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे आता मोकळा श्वास घेत असून 2024 मध्ये भाजपाची स्वबळावर सत्ता आणू, असेही त्यांनी म्हटले होते.