भाजपा सरकारला आगामी काळात राम मंदिर , ३७० कलम आदी प्रश्नांवर ठोस निर्णय घ्यावे लागणार : अन्वर राजन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 04:31 PM2019-05-24T16:31:31+5:302019-05-24T16:33:35+5:30
खरंतर यंदाच्या निवडणुकीत आम्ही भाजपच्या पराभवासाठी सक्रिय होतो.
पुणे : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षांचे सरकार स्पष्ट बहुमतासह सत्तेवर आले आहे. या निवडणुकीत भाजपाने राम मंदिर , ३७० कलम आदी प्रश्नावंर जनतेची मते मिळविण्यात यश मिळाले आहे. २०२४ च्या निवडणुकीत भाजपाला हे मुद्दे वापरुन मते मागता येणार नाही.त्यामुळे भाजपसमोर या प्रश्नांचे निराकरण करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन यांनी व्यक्त केले.
लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवत असलेल्या सर्व पक्षांच्या उमेदवारांचे अभिनंदन.. ह्या निवडणुकीत भाजपाच्या विजयाने विरोधी पक्षांना आत्मपरीक्षण करण्याचीही संधी ठेवलेली नाही, ही घातक अवस्था आहे. खरंतर यंदाच्या निवडणुकीत आम्ही भाजपच्या पराभवासाठी सक्रिय होतो. कारण गेल्या ५ वर्षांच्या काळात आणीबाणीसदृश परिस्थितीच होती. अनेक लेखक, कलाकार दडपणाखाली वावरत होते, प्रसारमाध्यमांवर निर्बंध येत होते. आणीबाणीच्या काळात जयप्रकाश नारायण यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे काम केले. या वेळी भाजपच्या सर्व विरोधकांना एकत्र आणणे नीटपणे न झाल्याने ते यशस्वी होऊ शकले नाहीत. आणीबाणीच्या काळात लोकांनी निवडणूक हातात घेतली होती, या वेळी मोदींच्या विरोधात असलेल्या मतदारांना एकत्र करता आले नाही.
देशाला विकासाच्या मार्गावर आणायचे असेल तर इथं शांतता नांदणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी दंगलीमुक्त देश असणे आवश्यक आहे. गोरक्षकांकडून होणारे हिंसाचार थांबले पाहिजेत. सध्या राजकीय पक्षांमध्ये असलेली ‘विचारशून्यता’ हा खूप मोठा धोका वाटतो. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा विरोधी पक्षनेता भाजपच्या वळचणीला जातो. इतरही काही पक्षांतर झाले. या पक्षातून त्या पक्षात जाणे अगदी सहज घडते, इथं कुठेही वैचारिक बैठक आड येत नाही.