VIDEO : राज ठाकरेंच्या भाषणाची दखल भाजपाला घ्यावी लागली - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 03:16 PM2019-04-09T15:16:52+5:302019-04-09T15:45:04+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाची दखल सत्ताधाऱ्यांना घ्यावी लागली आहे, असे सांगत अजित पवार यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाची दखल सत्ताधाऱ्यांना घ्यावी लागली आहे, असे सांगत अजित पवार यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
शिरूर मतदार संघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि मावळ मतदार संघाचे उमेदावर पार्थ पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर अजित पवार माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, "राज ठाकरे सभा घेणार आहेत अशी ऐकीव माहिती आहे. आपल्या भाषणातून ते वस्तुस्थिती सांगत आहेत. त्यांची गुढीपाडव्याची सभा चर्चेत आहे. ते मोठा स्क्रिन लावतात आणि दाखले देऊन सभा घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणांची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांनी घेतली आहे.'
महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता वाढत आहे. आज पुण्यात 38 डिग्री तापमान आहे. दुपारी कदाचित 40 डिग्री होईल. प्रत्येक उमेदवार, पक्ष कार्यकर्त्यांना उन्हाची काळजी घेवून कामे करावी लागणार आहेत. शरद पवार, नरेंद्र मोदी, राहुल गांधी आपापल्या परीने फिरत आहेत. मात्र, याआधी कोणत्याही पंतप्रधानांनी एवढ्या सभा घेतल्या नव्हत्या. सध्या त्यांचा जनाधार मिळवण्याचा प्रयत्न आहे, असे सांगत अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केले.
10 तारखेला नरेंद्र मोदींची बारामती सभा होती. ती आता पुढील टप्प्यात होणार असल्याचे समजते. विधानसभेवेळी त्यांची सभा झाली. तरी मला लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळाले. मी पण काही अतिशयोक्ती करत नाही. मात्र प्रत्येकाला सभा घेण्याचा अधिकार आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.
मावळमध्ये बेरोजगारी, अनेक जण बेरोजगार आहेत. दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या. मात्र सरकारने आश्वासन पाळले नाही. महाराष्ट्रावर कर्ज वाढत आहे. याशिवाय, देशातील महागाई कमी नाही, जीएसटी, नोटबंदी आणली. गरिबांकडे पैसे नाहीत, कॅशलेस व्यवहार सुरू होईल असे सांगितले होते. मात्र काहीही झाले नाही, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, भाजपाच्या विरोधात राज ठाकरे यांनी प्रचारसभा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. साहजिकच त्यांच्या या सभांचा फायदा आघाडीला होणार आहे. त्यामुळे आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरे यांना गोंजारण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.