पुणे/मुंबई - पुणे शहराला सोमवारी रात्री अचानक पावसाने चांगलेच झोडपून काढले. यामुळे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांसह, पेठांमधील दुकानदार, हॉकर्स यांच्यासह स्थानिकांचे हाल झाले. यात अनेकांच्या गाड्या बंद पडल्या. लहान लेकरांना सोबत घेऊन आलेल्या कुटुंबांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यातच विजांचा कडकडाट झाल्याने मुले घाबरत होती. अनेक जण जीव मुठीत घेऊन आडोसा शोधत होते. एकंदरीत पुण्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. प्रशासकीय यंत्रणा फोल ठरल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपला चांगलंच सुनावलं.
रात्रीच्या अचानक आलेल्या पावसाने रस्त्यांवर पुन्हा पाणीच पाणी झाले होते. त्यावरुन, आता राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला. ‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ पाच वर्ष पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहत आहे, अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला. त्यानंतर, आता अजित पवार यांनीही भाजप नेतृत्त्वाला टोला लगावला आहे.
स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे शहराचं पार वाटोळं करून ठेवलं आहे. काल सायंकाळी अतिवृष्टीमुळे भाजपशासित पुणे मनपानं पुण्यात काय दिवे लावलेत याची कल्पना येते. लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. मनपाला 'अव्यवस्थेची' कारणं काय आहेत ती सांगावीच लागतील, असा इशाराच अजित पवार यांनी दिला आहे. तसेच, तूर्तास पुण्यातील जनतेला आवश्यक ती सर्व मदत करणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही पाठपुरावा करतंच आहोत. जनतेनं देखील आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन करतो. सर्व प्रशासकीय यंत्रणा आवश्यक ती पाऊलं उचलून स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर काम करत असून त्याचा आढावा आम्ही घेत आहोत, असेही त्यांनी म्हटलं.
काय म्हणाले जयंत पाटील
पुण्यासारख्या जागतिक पातळीवर महत्वाच्या असणाऱ्या शहरात असे चित्र निर्माण होणे अत्यंत दुर्दैवी आहे असेही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पुणे शहरात अक्षरशः रस्त्यांच्या नद्या बनलेल्या आहेत. गेली २४ तास नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. गेली पाच वर्ष पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे असेही त्यांनी नमूद केले.