पुणे: भाजपाचे नेते किरीट सोमय्या ११ फेब्रुवारीला पुन्हा पुण्यातील महापालिकेमध्ये येणार आहे. हिंमत असेल तर त्यांना रोखून दाखवा, असा इशारा भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे भाजपा आणि शिवसेना असा वाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
किरीट सोमय्या यांना पुण्यात येण्याचे निमंत्रण देण्यात आले असून ११ फेब्रुवारीला महापालिकेच्या त्याच पायरीवर सोमय्यांचे जंगी स्वागत करणार असल्याचे भाजपाचे नेते जगदीश मुळीक यांनी सांगितले आहे. पुण्यातील भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली, अशी माहिती देखील जगदीश मुळीक यांनी दिली.
तत्पूर्वी, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महानगरपालिकेत हल्ला करण्यात आला होता. शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे आणि त्याची काही साथीदार सोमय्या यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी निवेदन न स्वीकारल्यामुळे शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पुणे महापालिका परिसरात असताना सोमय्या यांना काही शिवसैनिकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या महापालिकेच्या इमारतीच्या पायऱ्यांवर कोसळले. याप्रकरणी पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी शिवसैनिकांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हल्ला प्रकरणातील ११ आरोपींना जामीन मंजूर-
भाजपा माजी खासदार किरीट सोमय्या यांना पुणे महापालिका परिसरात धक्काबुक्की केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अटक केलेल्या 12 आरोपींना पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्तात मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने प्रथम आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र बचाव पक्षाच्या वतीने जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला.
सरकारी वकिलांनी त्या अर्जाला विरोध केला. पण या प्रकरणातील गुन्हे जामीनपात्र असल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केल्यानंतर केला. अतिरिक्त न्यायदंडाधिकारी एस.व्ही. दिंडोकर यांनी प्रत्येकी साडेसात हजार रूपयाच्या जातमुचलक्यावर अटक केलेल्या आरोपींना जामीन मंजूर केला. संजय हरिश्चंद्र मोरे, किरण प्रकाश साळी, सुरज मथुराम लोखंडे, आकाश चंद्रकांत शिंदे , रूपेश आनंदराव पवार, राजेंद्र दामोदर शिंदे, निलेश दशरथ गिरमे , मुकुंद पांडुरंग चव्हाण, अक्षय शरद फुलसुंदर, निलेश हनुमंत जगताप आणि सनी वसंत गवते अशी जामीन मिळालेल्या आरोपींचे नावे आहेत.