चिंचवड : चार विद्यमान नगरसेवकांची आमने-सामने होणारी लढाई हा प्रभाग क्रमांक १९ चा चर्चेचा विषय होता. धनशक्तीचे प्रदर्शन आणि गुन्हेगारीचे डाग लागलेल्या या प्रभागात भाजपाचे चारही उमेदवार निवडून आल्याने राष्ट्रवादीचे सपशेल पानिपत झाले. सर्वाधिक झोपडपट्टीचा भाग असणाऱ्या या प्रभागात भाजपाने एकतर्फी विजय मिळविला.या निवडणुकीत संवेदनशील प्रभाग अशी ओळख असलेल्या या भागाला गुन्हेगारीचे डाग लागले. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक काळुराम पवार व भाजपाचे उमेदवार शैलेश मोरे यांच्यात झालेली मारामारी, पैसे वाटपाच्या चर्चा यामुळे झालेले वाद यातून भाजपाने सरशी केली. राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक गुरुबक्ष पहेलानी यांनी प्रचाराला पाठ दाखविल्याने हा मुद्दा महत्त्वाचा ठरला. प्रतिस्पर्ध्यांनी याचाच प्रचार करत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा प्रचार करत निवडणुकीत घवघवीत यश मिळविले.अ गटातून भाजपाचे शैलेश मोरे विजयी झाले. त्यांनी १०५२५ मते घेत राष्ट्रवादीचे प्रतिस्पर्धी उमेदवार काळुराम पवार यांना पराभूत केले. पवार यांना ५९६१ मते मिळाली. या गटात एकूण १५ उमेदवार रिंगणात होते. कारागृहात असूनही बहुजन समाज पार्टीचे अरविंद साबळे यांनी ३८९९ मते घेतली. काँग्रेसचे बाळासाहेब बनसोडे यांना १४७९, आरपीआयचे नितीन गवळी यांना ९६१, शिवसेनेचे सचिन शिंदे यांना २०१८ व मनसेचे संतोष तेलंगे यांना ६६२ मते मिळाली. २५८ मतदारांनी नोटाचा वापर केला. भाजपाचे शैलेश मोरे यांनी पवार यांचा ४५६४ मतांनी पराभव करून विजय मिळविला.क गटातून भाजपाच्या कोमल मेवानी यांनी राष्ट्रवादीच्या विजया भोईर यांचा ५८६४ मतांनी पराभव केला. मेवानी यांना १०९२४ मते मिळाली. शिवसेनेच्या विद्या गोलांडे यांना ४७३८ मते मिळाली. बहुजन समाज पार्टीच्या लक्ष्मी देवकर यांना २७२४ मते मिळाली, तर मनसेच्या अश्विनी बांगर यांना १०६२ मते मिळाली. या गटात १११३ मतदारांनी नोटाचा वापर केला.ड गटातून भाजपाचे विद्यमान नगरसेवक शीतल ऊर्फ विजय शिंदे यांच्या गळ्यात पुन्हा विजयाची माळ पडली. त्यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक गुरुबक्ष पहेलानी यांचा २९९५ मतांनी पराभव केला. शिंदे यांना ८९३७ मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेच्या चेतन गावडे यांना ५९४२ मते मिळाली. बहुजन समाज पार्टीच्या राजेश ढावरे यांना २०८७ मते मिळाली. काँग्रेसचे सुभाष माछरे यांना १०९५ मते मिळाली. या प्रभागात राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा अशी सरळ लढत होईल असे चित्र होते. मात्र या निवडणुकीत भाजपाने एकतर्फी विजय मिळविला. निकालाच्या पहिल्या फेरीपासूनच भाजपाचे पॅनल आघाडीवर होते. शेवटच्या फेरीपर्यंत ही आघाडी कायम राहिल्याने संपूर्ण पॅनलचा विजय झाला.(वार्ताहर)
भाजपाने मारली मुसंडी
By admin | Published: February 25, 2017 2:26 AM