पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आतापासून कंबर कसून कामाला सुरुवात केली आहे. महायुतीकडून तर जागावाटपही सुरु झाले आहे. तर काँग्रेसची सध्या भारत जोडो यात्रेमार्फत जोरदार तयारी सुरु आहे. अशातच विधानसभेबाबतही चर्चाना उधाण आलंय. महाराष्ट्रात येत्या निवडणुकीत मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची नावे महायुतीकडून चर्चेत आली आहेत. अशातच अमित शाह यांनी केलेल्या विधानाने महाराष्ट्रातील महायुतीची ताकद वाढल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने ‘चारसो पार’चा नारा दिला असून पुढील ३० वर्षे केंद्रात भाजपची सत्ता राहील यादृष्टीने प्रयत्न करा असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले होते. त्यानंतर महायुतीच्या राजकीय नेत्यांमध्ये जिंकण्याबाबतचा विश्वास निर्माण झाल्याचे त्यांच्या बोलण्यातून दिसू लागले आहे. अशातच शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी पुढील 30 वर्षे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, असा दावा केला आहे. ते पुण्यात बोलत होते.
अब्दुल सत्तार म्हणाले, अमित शाह यांचे बोलणे योग्य असून, देशात लोकशाही आहे. जोपर्यंत लोक एखाद्या नेत्याच्या पाठीशी आहेत आणि ज्या पक्षाचे जास्त खासदार निवडून येतात आणि तो पक्ष सत्तेत राहतो. त्यामुळे भाजप पुढील 30 वर्षे सतत राहणार आणि त्यांच्या सोबत आम्ही सत्तेत असणार आहे. त्यामुळे आमचा फायदा होणार असून, पुढील 30 वर्षे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, असा दावा सत्तार यांनी केला.