जनतेच्या मनात भाजपच; 'मविआ' सरकार गेले तरच महाराष्ट्राचा विकास, भागवत कराडांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 07:27 PM2022-03-11T19:27:05+5:302022-03-11T20:20:22+5:30
केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ भागवत कराड यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला. कृषी, शेतकरी, बाजार समिती , जलसंधारण प्रकल्प, पशुसंवर्धन, आरोग्य, वाहतूक, मेट्रो, रेल्वे, पर्यटन, ऐतिहासिक वास्तू, गड - किल्ले अशा अनेक क्षेत्रांना आर्थिक तरतुदी जाहीर केल्या आहे. याबाबत विरोधी पक्षांनी टीका करण्यात सुरुवात केली आहे. त्यातच केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ भागवत कराड यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकार लवकर गेले तरच महाराष्ट्राचा विकास होणार असे त्यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
कराड म्हणाले, महाराष्ट्राचा विकास हवा असेल तर महाविकास आघाडी सरकार लवकर गेले पाहिजे, महाविकास आघाडी सरकारकडून जनतेच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत. राज्यातील जनतेच्या मनात भाजपच आहे. त्यामुळे राज्यात पुढचे सरकार भाजपाचेच असेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडी सरकार केवळ घोषणा करण्यात पटाईत
''महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मात्र अत्यंत निराशाजनक आहे. महाविकास आघाडी सरकार केवळ घोषणा करण्यात पटाईत आहे. केंद्राने पेट्रोल डिझेल स्वस्त करुनही राज्याने कर कमी केला नाही. यंदाच्या अर्थसंकल्पात शैक्षणिक क्षेत्र, उद्योग क्षेत्र, मागसवर्गासाठी कोणतीही तरतूद नाही. वीजबिल भरले नाही तर शेतक-यांचा वीजपुरवठा खंडित केला जात असताना शेतक-यांना वीजजोडणी सुविधा दिलेली नाही अशी टिळकही त्यांनी यावेळी केली आहे.''
महागाई न वाढण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करणार
रशिया-युक्रेन युध्दाच परिणाम पेट्रोल, डिझेल यांच्या किंमती वाढतील, अशी चर्चा आहे. केंद्र सरकारने मंत्र्यांची एक समिती तयार केली आहे. जनतेच्या हिताचा विचार करुन महागाई न वाढण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.