विविध मागण्यांबाबत
शासनास दिले निवेदन
बारामती : इंदापूर तालुका भाजप शिक्षक आघाडीच्या वतीने आज माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाबा चौक ते पंचायत समितीपर्यंत घोषणा देत मोर्चा काढला. तसेच पंचायत समितीच्या आवारामध्ये धरणे आंदोलन करून सरकारला आपल्या विविध मागण्यांचे लेखी निवेदन दिले आहे.
सबंध राज्यामध्ये बुधवारी (दि. ८) भाजप शिक्षक आघाडी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत आहे. त्यानुसार इंदापूर येथे पुणे जिल्हा भाजप शिक्षक आघाडीचे अध्यक्ष संतोष कदम, नगरसेवक कैलास कदम आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे आणि इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनानुसार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या तारखा तत्काळ घोषित कराव्यात, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशत: अनुदानित शाळांमध्ये नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बंद केलेले भविष्य निर्वाह निधीचे खाते तत्काळ सुरू करावे, एक तारखेला वेतन मिळण्याबाबत व वेतनास विलंब करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम व वैद्यकीय प्रतिपूर्तीची रक्कम तत्काळ द्यावी, परिविक्षाधीन सहायक शिक्षक (शिक्षणसेवक) परिविक्षाधीन शिक्षकेतर कर्मचारी (शिक्षकेतर सेवक) यांचे मानधन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वाढवावे, शिक्षक भरती प्रक्रिया तत्काळ सुरू करावी, शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्रिस्तरीय १०, २०, ३० आश्वासित प्रगती योजना तत्काळ लागू करावी. घोषित, अघोषित व मूल्यांकनास पात्र तुकड्या, शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देण्याची प्रत्यक्ष कार्यवाही करावी, रात्रशाळेतील कर्मचाऱ्यांना १७ मे २०१७ च्या शासन निर्णयानुसार पूर्णकालीन कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्वप्रकारचे लाभ मिळावेत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
या मागण्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, शालेय राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर सचिव वंदना कृष्णा यांना लेखी निवेदन दिले आहे. इंदापूर येथील धरणे आंदोलनावेळी शंकर हुबाले, अंबादास कांबळे, रमेश कुलकर्णी, संताराम ढावरे, अण्णासाहेब खटके, रघुनाथ पन्हाळकर, अर्जुन भोंग, दादा चौधरी, शंकर गुळीक, शशिकांत गायकवाड, यशवंत केवारे, बाळासाहेब गटकूळ व इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळी : इंदापूर येथे भाजप शिक्षक आघाडीच्या वतीने आपल्या विविध मागण्यांबाबत धरणे आंदोलन केले.
०८०९२०२१-बारामती-०६