पुणे: कसबा विधानसभा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पोटनिवडणूक येत्या २६ फेब्रुवारीला रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीची राज्यभर चर्चा सुरु झाली आहे. सात फेब्रुवारीला अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप, बाळासाहेंबाची शिवसेना, आरपीआय, शिवसंग्राम पक्ष महायुतीचे उमेदवार हेमंत रासने हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हेमंत रासने हे सकाळी साडेनऊ वाजता ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरचे दर्शन घेऊन अर्ज भरण्यासाठी निघाले आहेत. परंतु या रॅलीत मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक आणि चिरंजीव कुणाल टिळक न आल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे.
शैलेश टिळक यांनी कसब्यातून उमेदवारीसाठी मागणी केली होती. परंतु त्यांना डावलून हेमंत रासने याना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे टिळक कुटुंबीयांमध्ये नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. जेव्हा खुद्द हेमंत रासने यांनी टिळक कुटुंबियांची भेट घेतली तेव्हा शैलेश टिळक यांनी पक्षावर नाराज नसल्याचे सांगितले होते. परंतु आज दोघेही रॅलीत उपस्थिती न राहिल्याने नाराजीबद्दल विविध प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
भाजप हा शिस्तबद्ध पक्ष
मुक्ता टिळक यांना गेल्या वेळेची पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले होते. तेव्हा मीसुद्धा उमेदवारी मागितली होती. भाजप हा शिस्तबद्ध पक्ष असल्याने आमच्याकडे नाराजीची भाषा चालत नाही. विरोधात कोणीही असो कसाही प्रचार करो, भाजप आणि मित्र पक्षांच्या बळावर आम्ही विजय मिळवणारच आहोत. असा विश्वास हेमंत रासने यांनी व्यक्त केला आहे.