पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांची भेट घेतली. त्यामुळे बनसोडे यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा रंगली आहे. तर भाजपनेही पिंपरीत घर चलो अभियान सुरू केले आहे. त्यामुळे शिवसेना की भाजपला मतदारसंघ जाणार याबाबत चर्चा रंगली आहे. ‘‘पिंपरीत अभियान राबविले जात असले तरी जागा कोणाला जाणार? याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पिंपरी-चिंचवड दौरा झाला. अनेक महिन्यांपासून नाराज असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांची मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याबरोबर भेट घेतली. त्यामुळे बनसोडे यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. तर भाजपनेही पिंपरीत घर चलो अभियानाचे आयोजन केले आहे.
याबाबतच्या पत्रकार परिषदेस आमदार उमा खापरे, प्रभारी वर्षा डहाळे, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे राजेश पिल्ले, अमोल थोरात, अनुप मोरे, राजू दुर्गे, माजी उपमहापौर हिराबाई घुले, महिला मोर्चा अध्यक्ष उज्ज्वला गावडे, नगरसेवक केशव घोळवे, अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, माउली थोरात, शितल शिंदे, शैलेश मोरे, मंडल अध्यक्ष विजय शिनकर उपस्थित होते.