पुणे - राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे दुखःद निधन झाले. ते महाराष्ट्रातील भाजपच्या जेष्ठ नेत्यांपैकी एक होते. चार दशकांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी अनेक पदे भूषवली. गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने उमेदवारी दिली अन् ते पहिल्यांदाच खासदार बनून दिल्लीत गेले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. तरीही, पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी त्यांनी पक्षाच्या उमेदवाराच प्रचार केला होता. दरम्यान, त्यांच्या निधनाने आता पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागणार आहे. त्यासाठी, भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.
गिरीश बापट यांनी संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार, राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अशा विविध पदावर काम केले. पुणे शहरातील राजकारणात बापट यांची चांगली पकड होती. पुण्याची ताकद गिरीश बापट, बापट साहेब अमर रहे च्या घोषात खासदार गिरीश बापट यांच्यावर, बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ते ७२ वर्षांचे होते.
बापट यांच्या निधनाने भाजपचही मोठी हानी झालीय. तर, कायदेशीर प्रक्रियेनुसार आता पुण्यातील लोकसभेच्या जागेवर लवकरच निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी, भाजपकडून उमेदवारांचा शोध घेण्यात येत आहे. गत विधानसभेच्या पोटनिवडणुकीत झालेली चूक लक्षात घेता, यावेळी भाजपकडून सावधानतेनं पाऊलं टाकली जात आहेत. त्यामुळे, या जागेसाठी ५ जणांची नावे सध्या चर्चेत आहेत. त्यामध्ये, पहिलं नाव हे बापट यांच्या कुटुंबातील असून त्यांच्या सुनबाई स्वरदा बापट यांचं आहे. तर, दुसरी पसंती ही माजी खासदार संजय काकडे यांनाही आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचंही नाव चर्चेत आहे. त्यासोबतच, पुणे भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांचंही नाव पुढे आलं आहे. तर, विधानसभेला तिकीट नाकारेल्या मेधा कुलकर्णी यांचंही नाव येथील उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. त्यामुळे, या ५ जणांपैकी कोणाच्या नावार शिक्कामोर्तब होईल, हे पाहावे लागणार आहे.
खासदार बापट यांना दिग्गजांची श्रद्धांजली
खासदार बापट यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सायंकाळी साडेपाच वाजता त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून फुलांनी सजविलेल्या रथातून निघाली. अंत्ययात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह शहर, शहरातील आमदार, माजी नगरसेवक व सर्व पक्षीय कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ओंकारेश्वर मंदिरापासून शगुन चौकातून ही अंत्ययात्रा लक्ष्मी रस्त्याने अलका टॉकिज चौक, शास्त्री रस्त्याने नवी पेठ मार्गे वैकुंठ स्मशानभूमीत आली.