PMC Election | तीन पक्षांपेक्षाही आघाडीची चिंता भाजपालाच जास्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 03:44 PM2022-06-07T15:44:20+5:302022-06-07T15:44:37+5:30
आघाडीतील तीनही पक्षांमधील संशयाचा भोवरा मात्र कायम...
- राजू इनामदार
पुणे : महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी होणार की नाही याची चिंता आघाडीतील तीन पक्षांपेक्षाही भारतीय जनता पार्टीच्या गोटातच जास्त आहे. गेल्या वेळचे पूर्ण बहुमतातील सत्ताधारी असले तरी त्यातील बरेचसे बाहेरच्या पक्षातील असल्यानेच ही चिंता भाजपाच्या धुरिणांना सतावते आहे. दुसरीकडे भाजपाने आघाडीची अशी भीती घेतलेली असली तरी खुद्द आघाडीतील तीनही पक्षांमधील संशयाचा भोवरा मात्र कायम आहे.
भाजपाबरोबरची अनेक वर्षांची युती तोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांना बरोबर घेत शिवसेनेने राज्यात सत्ता स्थापन केली. तोच फॉर्म्युला आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही वापरून पाहिला जाणार आहे. मात्र, तसे अद्याप जाहीर केलेले नाही. त्यामुळेच भाजपाचे नेते त्याकडे लक्ष लावून बसले आहेत. मतांच्या विभागणीचे गणित यावर अवलंवून असल्याने त्यांना आघाडीचे नक्की होते तरी काय याची चिंता लागली आहे.
यापूर्वी भाजपाच्या बरोबर नेहमीच शिवसेनेची युवा ताकद असायची. कोथरूड, खडकवासला व भाजपाचे आमदार असलेल्या अन्य विधानसभा मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत भाजपाला शिवसेनेची ही ताकद मिळायची. त्यामुळे त्यांचे उमेदवार मतांच्या गणितात अन्य पक्षीय उमेदवारांच्या एकदम पुढे जात. आता ही ताकद नसणार आहेच, पण महाविकास आघाडी झाली तर शिवसेनेची ही ताकद अन्य दोन पक्षांना मिळणार आहे.
महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची शहरात वेगवेगळ्या ठिकाणी एकगठ्ठा मते आहेत. वेगवेगळे लढले तर ही मते त्यांची त्यांना मिळतील. मात्र, एकत्र लढले तर मात्र ही सगळी मते एकगठ्ठा त्यांच्या उमेदवाराला मिळतील व भाजपाचा उमेदवार मागे पडेल असे नेत्यांना वाटते आहे. भाजपाबरोबर आरपीआय (आठवले गट) आहे, मात्र त्यांचे मतदान कमी आहे व तेही सर्वच्यासर्व भाजपाच्या उमेदवाराला पड़ेल याची त्यांनाच खात्री नाही.
भाजपा मागील सलग ५ वर्षे महापालिकेच्या सत्तेत आहे. त्यांचे त्यावेळी स्वतंत्रपणे लढून ९८ नगरसेवक निवडून आले. त्यातील ३० पेक्षा जास्त नगरसेवक महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षातून घेतलेले आहेत. तिथे उमेदवारी मिळत नाही असे लक्षात आल्यावर भाजपाने त्यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली आहे. बाहेरचे म्हणून सत्तेत या नगरसेवकांना फारसे सामावून घेतले गेले नाही, त्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे.