“नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे संपूर्ण जगात भारताची प्रतिमा उंचावली आहे. पायाभूत सुविधांना वेग देण्याबरोबरच सामान्य माणसासाठी अनेक कल्याणकारी योजना मोदी सरकारने सुरु केल्याने सामान्य माणसाच्या जीवनमानात बदल घडला आहे. ही कामे सामान्य माणसापर्यंत नेऊन निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कटिबद्ध व्हा,” असं आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी पुण्यात केलं. भाजपा प्रदेश कार्यसमिती बैठकीच्या समारोपप्रसंगी नड्डा बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, तरुण चुघ, राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, सुनील देवधर, वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आदी यावेळी उपस्थित होते.
“मोदी सरकारच्या कामामुळेच ब्रिटनला मागे टाकत भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था बनला आहे. त्यामुळेच भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे. कोरोना संकटाचं मोदी सरकारनं संधीत रूपांतर केल्यामुळे भारताचा जीडीपी जगात सर्वाधिक वेगाने वाढणारा ठरला आहे. नेपाळ, श्रीलंका यासारख्या अनेक देशांना संकटात मदत करून भारताने आपली नवी ओळख निर्माण केली आहे,” असंही नड्डा म्हणाले.
दळणवळणाकडे काँग्रेसचं दुर्लक्ष
काँग्रेसच्या काळात सीमावर्ती भागातील रस्त्यांसारख्या दळणवळणाच्या सुविधा निर्माण करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले होते. मोदी सरकारने सीमावर्ती भागात चौपदरी रस्त्यांचे जाळे निर्माण केल्याने देशाची सुरक्षा मजबूत झाली आहे. देशभर द्रुतगती महामार्ग, चौपदरी रस्ते, महामार्ग यांची कामे मोठ्या वेगाने सुरु आहेत. गेल्या ८ वर्षांत विमानतळांची संख्याही वाढली आहे. वंदे भारत सारखी नवभारताचा चेहरा असणारी रेल्वे सुरु झाल्याचंही ते म्हणाले.
सत्तेचं राजकारण करणारा पक्ष नाही
“भाजप हा केवळ सत्तेचे राजकारण करणारा पक्ष नाही. कोरोना काळात भाजप कार्यकर्त्यांनी कोट्यवधी जनतेची सेवाभावाने मदत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना ७ सूत्रांचं आचरण करण्यास सांगितलं आहे. सामान्य माणसाच्या भाजपा कार्यकर्त्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी जनतेशी संवाद ठेवत सेवाभाव वृत्ती जोपासली पाहिजे,” असं नड्डा म्हणाले.
राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ यांनी संघटनात्मक बाबींविषयी कार्यसमिती बैठकीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला.