इंदापूर (पुणे) : देश व राज्यातील शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणणारे भाजपा सरकार म्हणजे ‘ब्रिटिश भ्रष्ट जुमला पार्टी’ आहे, अशी टीका खा. सुप्रिया सुळे यांनी शेतकरी आक्रोश मोर्चानिमित्ताने बोलताना केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन झाल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी खा. डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते.
खा. सुळे म्हणाल्या की, केंद्राच्या शेतकरीविरोधी धोरणाचा फटका राज्य व देशातील शेतकऱ्यांना बसत आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम सामान्यांच्या जगण्यावर होत आहे. शेतकऱ्यांनी अत्यंत कष्टाने पिकवलेल्या कांद्याला तुटपुंजा दर मिळत आहे. निर्यात होणाऱ्या कांद्यावरचे शुल्क वाढवून, कांद्याची निर्यात बंद करण्याचा प्रकार केंद्र सरकारने केला आहे. टोमॅटोला चांगला दर मिळत असताना नेपाळमधून टोमॅटोची आयात करण्यात आल्याने देशातील टोमॅटोचे दर कमी झाले आहेत. त्याचा फटका टोमॅटो उत्पादकांना बसतो आहे. देशातील कापूस उत्पादकांकडे दुर्लक्ष करत इस्रायलमधून कापूस आयात केला. तूर आणि उडीद पिकांबद्दलही तसेच धोरण स्वीकारल्याने उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. देशात खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खताच्या पिशवीतील पाच किलो खत काढून घेत अडचणीत भर टाकली आहे. या गोष्टी नेमक्या कोणी केल्या हे सर्वांना माहीत आहे, असे त्या म्हणाल्या.
सध्या सरकारमधील सगळे मंत्री पोपटासारखे बोलू लागले आहेत. मात्र, एकही मंत्री राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोंड उघडत नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला ठणकावून सांगताना दिसत नाहीत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल आस्था राहिलेली नाही. म्हणूनच आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपण खा. अमोल कोल्हे यांच्यासमवेत कांदे घेऊन गेलो होतो. कांद्याच्या प्रश्नाबाबत आम्हाला फक्त दोन मिनिटे बोलायचे आहे, असे आम्ही सांगितले. तथापि, या सरकारमधील लोकांनी आम्हा दोघांनाही बाहेर जाण्यास सांगितले, असे सांगून खा. सुळे म्हणाल्या की, शेतकऱ्यांच्या व सामान्यांच्या प्रश्नांबाबत संसदेत आवाज उठविण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आमचे निलंबन करण्यात आले. आम्ही दोघेही उच्चशिक्षित आहोत. लोकांच्या अडीअडचणी व प्रश्नांसाठी आम्ही राजकारणात आलो आहोत, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारूद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने, अशोक घोगरे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ, महिला तालुकाध्यक्ष छायाताई पडसळकर, शहराध्यक्ष रेश्मा शेख, अक्षय कोकाटे, बाळासाहेब कोकाटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडीतील शिवसेना व काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने या शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
इंदापूरकरांचा हिरमोड
मालिकांमध्ये तडफदारपणे छ. संभाजीराजे यांची भूमिका करणारे, या भूमिकेची अमीट छाप जनमानसावर टाकणारे खा. डॉ. अमोल कोल्हे पहिल्यांदाच इंदापूर शहरात आले होते. पुणे-सोलापूर महामार्गावरील बाबा चौकातून निघणाऱ्या त्यांच्या पदयात्रेची सांगता जुन्या तहसील कार्यालयापाशी होणार होती. वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीतच जुने तहसील कार्यालय होते. त्यामुळे खा. डॉ. कोल्हे यांनी किमान गढीचे दर्शन तरी घ्यावे, अशी इंदापूरकरांची इच्छा होती. मात्र, निमगाव केतकीकडे जाण्याच्या ओढीने खा. सुप्रिया सुळे, खा. डॉ. कोल्हे हे गढीसमोरून झपाट्याने पुढे गेल्याने इंदापूरकरांचा हिरमोड झाला.