पुणे: निवडणूका जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष देश तोडण्याचे काम करत आहे असा हल्ला तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी भारतीय जनता पक्षावर चढवला. याचा प्रतिकार सर्वांना एकत्र राहूनच करावा लागेल असे ते म्हणाले. महाविकास आघाडीतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ रेड्डी यांची काँग्रेस भवनमध्ये सोमवारी सकाळी पत्रकार परिषद झाली.
रेड्डी म्हणाले, " भाजप मागील ११ वर्षे सत्तेत आहे. या काळात काय केले ते त्यांनी सांगावे. महाराष्ट्रात सत्ता आल्यावर काय करणार ते सांगावे. पण सांगण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही. २ कोटी लोकांना रोजगार देऊ असे आश्वासन त्यांनी दिले होते. ११ वर्षात फक्त १ टक्का रोजगार निर्मिती झाली. देशात असंतोष निर्माण करणारा नागरिकत्व कायदा त्यांनी केला. त्यांच्याच सत्ताकाळात शेतकर्यांचे ११ महिन्यांचे आंदोलन झाले. सरकारने लक्ष न दिल्याने त्या आंदोलनात ७०० शेतकरी म्रुत्यूमुखी पडले. देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत, पण इथल्या प्रचारात ते त्याविषयी काहीच बोलत नाहीत."
प्रत्येक निवडणूकीत ते जिंकण्यासाठी म्हणून हिंदु मुस्लिम, हिंदु ख्रिश्चन असा प्रचार करून देश तोडण्याची भाषा करत असतात. हिमाचल प्रदेशमध्ये ९५ टक्के हिंदुच आहेत, पण त्यांनी काँग्रेसला मतदान केले. त्यामुळेच असा प्रचार करणे अयोग्य आहे,मात्र सांगावे असे दुसरे काहीच नसल्याने ते हाच प्रचार सर्व निवडणूकांमध्ये करतात असे रेड्डी म्हणाले.
केंद्र सरकारने १६ लाख कोटीची कर्ज माफ केली. त्यामुळे सामान्यांना काही देणाऱ्या योजना जाहीर होत असतील तर ते चांगलेच आहे असे मत रेड्डी यांनी.व्यक्त केले. शेवटी हा पैसा वेगवेगळ्या मार्गाने सरकारकडेच येणार आहे असे ते म्हणाले.