Devendra Fadnavis Live: आपण सौभाग्यशाली आहोत की आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेते लाभले. पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व वैश्विक नेतृत्व आहे. केवळ भारताचे पंतप्रधान एवढ्यापुरते ते मर्यादित राहिलेले नाहीत, तर संपूर्ण विश्व ज्या नेतृत्वाकडे आदराने पाहते, अशा प्रकारचे नेतृत्व पंतप्रधान मोदी आहेत, असे कौतुकोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
पुण्यात modi@20 पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. गेल्या ९ वर्षांत आपण बघितले की, भारताला ज्या प्रकारे त्यांनी परिवर्तित केले, गरीब कल्याणाचा अजेंडा राबवून भारतातील सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन केले. एक आत्मनिर्भर भारत निर्माण केला. जगाच्या पाठीवर ताठ मानेने जो भारत उभा राहू शकतो, असा भारत तयार केला. आज जगातील ५ वी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था पंतप्रधान मोदी यांनी भारताची तयार केली. देशाला जागतिक पातळीवर महत्त्वाचा देश म्हणून मान्यता मिळवून देताना, मूठभरांचे नाही, तर बहुजनांचे कल्याण करणाऱ्या योजना राबवून भारताला परिवर्तित करण्याचे काम हे पंतप्रधान मोदी यांनी करून दाखवले. तसेच मागील २० वर्षात त्यांनी देशभरात काय परिवर्तन आणले हे त्यांच्या या पुस्तकात दिसून येईल. एक व्यक्ती १३५ कोटींचा देश कसा बदलू शकतो, याचा प्रत्यय आपल्याला येईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अमित शाहांनी अतिशय यशस्वीरित्या जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवून दाखवले
अमित शाहांनी अतिशय यशस्वीरित्या जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवून दाखवले. राहुल गांधी काश्मीरात गेले आणि तिरंगा झेंडा फडकवून आले. काँग्रेसच्या काळात त्यांना हे शक्य नव्हते. कारण नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी कलम ३७० हटवले म्हणून ते तिरंगा झेंडा फडकवू शकले, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
दरम्यान, या कार्यक्रमात सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख शिवसेनेचे नेते, खऱ्या शिवसेनेचे नेते असा केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिला. यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"