कळस: इंदापुर तालुक्यात भाजपा नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र राजवर्धन पाटील आणि संबधीत एका संस्थेतील जेष्ठ शिक्षक यांच्यामध्ये झालेल्या वादाची चांगलीच चर्चा रंगली आहे. या दोघांमध्ये झालेल्या एका संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पाटील यांच्याशी संबंधित असणाऱ्या शिक्षण संस्थेमध्ये संबधित शिक्षक सेवा बजावत आहेत. शिक्षण संस्थेची निगडित असणाऱ्या एका व्हाट्सअप ग्रुप वर इंदापूर चे लोकप्रतिनिधी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा एक फोटो संबंधित शिक्षकाने पोस्ट केला. त्यामुळे वाद निर्माण झाल्याचे या ऑडिओ क्लीपवरुन स्पष्ट होत आहे.
ग्रुप वर फोटो का टाकला, याचा जाब विचारण्यासाठी राजवर्धन पाटील यांनी या शिक्षकाला आपल्या मोबाईल वरुन संपर्क साधला. दोघांमध्ये झालेल्या शाब्दीक खडाजंगी संभाषणाचे सर्व रेकॉर्डिंग या शिक्षकाने आपल्या मोबाईल मध्ये केले. त्यानंतर ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली.
या क्लिप मध्ये राजवर्धन पाटील हे रागात बोलले असले तरी समोरील व्यक्तीला त्यांनी एकही शब्द एकेरी वापरला नाही. ज्या संस्थेत आपण काम करतो त्यांच्याशी प्रामाणिक रहा ,असे सांगत आहेत. मात्र समोरील व्यक्तीने पाटील यांना नातवाच्या वयाचे संबोधत एकेरी संवाद साधला आहे. तसेच शिक्षण संयमाने न बोलता राजवर्धन यांना बोलायला भाग पाडल्याची चर्चा आहे.
दरम्यान,या क्लिप च्या मुद्द्यावरून तालुक्यात राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. संस्थेतील कर्मचाऱ्यांची मुस्कटदाबी करणे योग्य नाही. असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत. तर ज्या शिक्षकांना राजवर्धन यांनी जाब विचारला, त्या शिक्षकाने असभ्य भाषेत वर्तन केले हे शिक्षकी पेशाला अशोभनीय आहे ,अशा शब्दात पाटील यांना पाठबळ दिले जात आहे.