पिंपरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगतसिंग हे हिंदुत्ववादी विचारांचे होते. कम्युनिस्टांना आंबेडकरांचा विरोध होता. त्यांना डाव्या विचारांच्या लोकांनी हायजॅक केले, असे मत भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. चिंचवड येथील कलारंग संस्थेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘भविष्यातील भारत’ या विषयावर सुनील देवधर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देवधर बोलत होते.
सुनील देवधर म्हणाले, काँग्रेस पक्षानेही इंग्रजांसारखाच अन्याय केला. पाकिस्तान, बांगलादेशी लोकांसाठी भारत खैरात नाही. त्यामुळे सीएए-एनआरसीसारखा कायदा आणला. ज्या आमच्या संकल्पना नाहीत त्यांना आम्ही का आपले म्हणायचे. भारत हे हिंदुराष्ट्रच आहे आणि ते राहणारच, असेही सुनील देवधर म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंगांना हायजॅक केले-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग हे प्रखर हिंदुत्ववादी होते. मात्र, नंतर त्यांना काहीही हायजॅक केले. एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना रुजणे गरजेचे आहे. अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदींनी विशेष लक्ष देऊन ईशान्य भारताला आपलेसे केले, त्यामुळे श्रेष्ठ भारत संकल्पना रुजायला मदत झाली. आदिवासी हे येथील खरे क्रांतिकारक आहेत. बिरसा मुंडा, अल्लुरी सीतारामन, ज्यो की बान, कनकलता बरुआ यांची कुठेही नोंद नाही. नरेंद्र मोदींनी स्व चा खरा अर्थ सांगितला. स्वदेशीेचा लाभ खऱ्या अर्थाने आता भारतीय नागरिक अनुभवत आहेत. देशाचा अमृतमहोत्सव साजरा करताना प्रत्येकाला घर मिळाले आहे. ज्यांना घरे बाकी आहेत. त्यांना लवकरच मिळतील. भाजपने योजना या सर्वसामान्यांसाठी आहेत. भाजप स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करत नाही. मोदी प्रत्येकांना आपल्या घरातले सदस्य वाटतात, असेही ते म्हणाले.
मुस्लीम, ख्रिश्चन या धर्मात स्त्री-भ्रूणहत्या नाहीत
सगळ्यात जास्त स्त्री - भ्रूणहत्या हिंदूंमध्ये झाल्या. मुस्लीम, ख्रिश्चन या धर्मात स्त्री-भ्रूणहत्या झाल्या नाहीत. भ्रूणहत्या थांबवण्याबरोबरच महिलांच्या शिक्षणाची कास धरणारे ज्योतिराव फुले हे आहेत. त्यांचे आमच्यावर उपकार आहेत. त्यांचा आदर्श घेऊनच मोदी सरकार काम करत असल्याचे देवधर यांनी सांगितले.
यावेळी पद्मश्री गिरीश प्रभुणे, आमदार उमा खापरे, एकनाथ पवार, सदाशिव खाडे, नामदेव ढाके, अमित गोरखे, शैलजा मोरे, विनोद बन्सल, माजी खासदार अमर साबळे, अनुराधा गोरखे, शंकर जगताप, मुकुंद कुलकर्णी, हेमंत हरहरे, मिलिंद देशपांडे, महेश्वर थोरात, प्रकाश मिठभाकरे आदींची उपस्थिती होती.