BJP Vinod Tawde ( Marathi News ) : महाराष्ट्रात मागील काही महिन्यांपासून आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय तणाव निर्माण झालेला असताना पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे एकत्र आलेले पाहायला मिळाले. विश्वास पाटील लिखित 'अण्णाभाऊ साठे - दलित आणि महिलांचे कैवारी' या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना विनोद तावडे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्यावरील या ग्रंथाचं इतर भाषांमध्ये भाषांतर करण्याच्या कामासाठी मी शरद पवार यांच्यासोबत असेन, असं म्हटलं आहे.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर भाष्य करताना विनोद तावडे म्हणाले की, "महाराष्ट्रात सध्या जी स्थिती आहे ती यापूर्वी कधीच नव्हती. आम्ही सभागृहात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासह सत्तेतील नेत्यांवर आक्रमक टीका करायचो. मात्र नंतर एकत्र जेवायचो. परंतु असं चित्र आता पुन्हा दिसेल की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह आहे."
शरद पवारांबाबत काय म्हणाले विनोद तावडे?
आपल्या भाषणात शरद पवारांवर बोलताना विनोद तावडे म्हणाले की, "कार्यक्रमाला येण्याची माझी इच्छा सुरुवातीपासूनच होती. मात्र आता निवडणुकांचे दिवस जवळ आले आहेत. या कार्यक्रमाला येण्याआधी माझा मनात साशंकता होती. कारण एकीकडे रावसाहेब कसबे सर येणार, ते एक विशिष्ट झोत टाकणार, माननीय पवारसाहेब झोत टाकतात त्या झोताचा प्रकाश कुठे पडलाय, ते शोधण्यातच सगळ्यांचा वेळ जातो," असं तावडे यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये चांगलाच हास्यकल्लोळ झाला.
दरम्यान, "अण्णाभाऊ साठे यांच्यावरील या पुस्तकाचं इतर भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी मी शरद पवारांसोबत असेन. पवारसाहेब मोदी साहेबांकडून अनेक गोष्टी करुन घेऊ शकतात. त्यामुळे मी या कामात पवार यांना मदत करेन," असंही तावडे यांनी यावेळी म्हटलं.