पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी आणि शिक्षण समितीच्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या नगरसेवकांना 'व्हिप' बजावला आहे. एकहाती सत्ता असलेल्या भाजपच्या नगरसेवकांना व्हिप बजावत आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याची तंबी देण्यात आली आहे. हा व्हिप म्हणजे नेहेमीच्या प्रक्रियेचा भाग असल्याचे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीच्या मार्गावर आहे. त्यातच सांगलीचा अनुभवही ताजा असल्याने हा व्हिप म्हणजे नो रिस्क ॲट ॲालच्या मोड मध्ये असल्याची चर्चा आहे.
पुणे महापालिकेच्या स्थायी समिती आणि शिक्षण समितीची निवडणुक शुक्रवारी पार पडते आहे.स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांनी तर, शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी भाजपच्यावतीने मंजुश्री खर्डेकर तर उपाध्यक्ष पदासाठी कलिंदा पुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी बंडू गायकवाड व शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी सुमन पठारे यांनी अर्ज दाखल केला आहे़ तर शिक्षण समितीच्या उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या प्राची आल्हाट यांनी अर्ज दाखल केला आहे़
गेल्या काही निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हे तिन्ही एकत्र लढत आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वीच झालेल्या निवडणुकीत भाजपमध्ये आलेले आयाराम पुन्हा गयाराम होण्याची चर्चा रंगली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपने बजावलेल्या 'व्हिप'ची चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे.
स्थायी समिती अध्यक्ष तसेच शिक्षण समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्षपदाची निवडणूक येत्या शुक्रवारी ५ मार्चला होणार आहे. यादिवशी शिक्षण समितीची निवडणूक सकाळी अकरा वाजता होणार असून, स्थायी समितीची निवडणूक दुपारी तीन वाजता होणार आहे. सदर निवडणुकीसाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. महापालिकेच्या नवीन इमारतीमधील स्थायी समितीच्या सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.